लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : गेल्या पालिका निवडणुकीत खंडेराव जाधव यांनी ‘एनए’ परिवाराचे नेतृत्व केले होते. परिवाराच्या ताकदीवर त्यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागितली होती. परंतु त्यांना ती देण्यात आली नाही. हक्काचा प्रभाग सोडून इतर प्रभागात त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. आता ते ‘एनए’ परिवाराचे नेतृत्व सोडून बाहेर पडले आहेत. आगामी पालिका निवडणुकीत जयंत पाटील यांचेच नेतृत्व मानून राष्ट्रवादीमध्ये खेळाडू म्हणून लढण्याची तयारी सुरू केली आहे.
‘एनए’ परिवारातून खंडेराव जाधव हे बाहेर पडले. यानंतर त्यांनी जयंत पाटील यांचे नेतृत्व मानून पाटील यांचे पुत्र प्रतीक आणि राजवर्धन पाटील यांच्या नावे निर्माण केलेल्या प्रतिराज फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमात आघाडी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी त्यांनी आता मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या यल्लाम्मा चौकात संपर्क कार्यालय सुरू केले आहे.
आगामी निवडणुकीत प्रभाग रचनेमुळे सिंगल वाॅर्ड होणार आहे. यामुळे राष्ट्रवादीमधून इच्छुकांची संख्या वाढणार आहे; तर काही प्रभागात उमेदवार मिळणे दुरापास्त होईल. पालिकेतील काही गटांची ताकद आता संपलेली आहे. त्यामुळे खंडेराव जाधव यांनी प्रतिराज फौंडेशनच्या माध्यमातून युवकांची फळी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला असला, तरी त्यांनाही मोठा अडसर निर्माण होण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा आगामी निवडणुकीत आव्हानात्मक प्रभागात लढण्याची त्यांची इच्छा आहे.
कोट
आगामी निवडणूक लढविण्याचे निश्चित आहे. एखाद्या गटाचे नेतृत्व करून राजकारण करण्यात सध्या तरी आपणास स्वारस्य नाही. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे नेतृत्व मानून पालिका निवडणुकीत उतरण्याची आपली तयारी आहे. परंतु राष्ट्रवादी पक्ष देईल तो प्रभाग आपण मोठ्या ताकदीने लढवणार आहे.
- खंडेराव जाधव, नगरसेवक
फोटो ०११२२०२०-खंडेराव जाधव