सांगली : रुग्णालयांमध्ये घडत असलेल्या आगीच्या घटनांमुळे शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. सध्या केलेल्या ऑडिटमध्ये काही गंभीर बाबी समोर आल्या असल्या तरी ‘क्वालिफाय’ नसलेल्या व्यक्तीकडून हे ऑडिट करण्यात आल्याने आता ‘वालचंद’सारख्या तज्ज्ञ संस्थांकडून फायर ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्री पाटील म्हणाले की, राज्यातील विविध ठिकाणी रुग्णालयात आगीच्या घटना घडत असल्याने सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याच्या आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार सांगली-मिरज शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले यात काही गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. मात्र, हे ऑडिट करणारा अधिकारी हा ‘क्वालिफाय’ नसल्याने या रुग्णालयांचे अजून एकदा तज्ज्ञ संस्थेकडून ऑडिट करण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. सांगलीत वालचंद अभियांत्रिकीसारखी तज्ज्ञ संस्था आहे. या संस्थेकडून ऑडिट करून घ्यावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यांच्याकडून ऑडिट आल्यानंतर त्रुटीबाबत कार्यवाही करता येईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.