इस्लामपूूर येथे विधवा पुनर्विवाह सोहळ्यात नवदांपत्यांना ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी शुभेच्छा दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी १०४ वर्षांपूर्वी विधवा पुनर्विवाहाचा कायदा करून समाजाच्या कल्याणाचा निर्णय घेतला होता. ते फक्त कायदा करून थांबले नाहीत, तर त्यांनी स्वत:च्या हाताने चुलत बहिणीचा आंतरजातीय विवाहसुद्धा घडवून आणला. महाराष्ट्राच्या या पुरोगामी विचारांचे पडसाद आज उरुण परिसरातल्या पाटील गल्लीत उमटले. अवघ्या पाच-सहा वर्षांच्या संसारानंतर पदरी आलेलं वैधव्य स्वीकारून आपल्या दोन मुलींसह माहेरी इस्लामपूूर येथे राहणाऱ्या विधवेचा पुनर्विवाह करून एक क्रांतिकारी पाऊल उचलले गेले.
येथील ‘लोकमत’च्या विभागीय कार्यालयाचे प्रमुख अशोक पाटील, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, वैधव्याच्या झळा सोसलेल्या शोभा पाटील यांच्या पुढाकाराने हा विधवा पुनर्विवाह सोहळा घडून आला. ‘लोकमत’मध्येच वितरण विभागात गेल्या २० वर्षांपासून काम करणारे संतोष कृष्णा नलवडे यांनी त्यासाठी एक पाऊल पुढे टाकत नीताच्या भाळी आलेले वैधव्य पुसून टाकताना तिच्यासोबत आनंदी अन् यशस्वी जीवनाची सप्तपदी चालण्याचा धाडसी निर्णय घेतला.
या विवाह सोहळ्यासाठी महादेव पाटील (कारभारी) यांनी पौराेहित्य केले. उरुण पाणी पुरवठा संस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, एम. जी. पाटील, अॅड. संपतराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, सचिन पाटील, रणजित पाटील, दिनकर पाटील यांनी या विवाह सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी पार पाडली. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, वितरण विभागाचे उपसरव्यवस्थापक संजय पाटील, प्रशासन विभागप्रमुख संतोष साखरे, शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस, सहायक वितरण व्यवस्थापक रवींद्र बिरंजे, उद्योजक सर्जेराव यादव, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, आनंदराव पाटील, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, प्रशांत पाटील, महेश पाटील, प्रदीप पाटील उपस्थित होते.