सांगली : शिक्षक बँकेत शून्य टक्के लाभांश देऊन सभासदांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पोटनियम दुरुस्त्यांचा घाट कशासाठी, असा सवाल शिक्षक संघाच्या पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी यांनी केला. शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सूर्यवंशी म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी रिझर्व्ह बँकेच्या पत्राचे भांडवल करून सभासदांना लाभांश दिलेला नाही. दोन अंकी लाभांशचा ढोल वाजविणाऱ्यांनी त्यांच्या सत्ताकाळात दुसऱ्यांदा शून्य टक्के लाशांभ दिला आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी पोटनियम दुरुस्तीचा घाट घातला आहे. सत्ताधारी कोणाचे हित जपत आहेत हा संशोधनाचा विषय आहे. निवडणुकीत समोर पराभव दिसत असल्याने डीसीपीएसधारकांच्या वारसांना दोन लाखांची अतिरिक्त मदत जाहीर करून त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सत्ताधाऱ्यांच्या या बेगडी प्रेमाला ते बळी पडणार नाहीत. सभासदांना न दिलेल्या अहवालाचा खर्च सत्ताधाऱ्यांनी सव्वा दोन लाखांपेक्षा जास्त लावला आहे. यावरूनच सत्ताधाऱ्यांची वारेमाप उधळपट्टी लक्षात येते, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे , सरचिटणीस अविनाश गुरव , कार्यकारी अध्यक्ष फत्तेसिंग पाटील , पार्लमेंटरी बोर्डाचे कार्याध्यक्ष संजय दिवे.................... यांच्यासह शिक्षक सभासद उपस्थित होते.
निवडणूक तोंडावर पोटनियम दुरुस्ती कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:25 IST