मिरज मेडिकल महाविद्यालयाशी संलग्न आरोग्यशिक्षण पथकाचा दवाखाना गेल्या अनेक वर्षांपासून तासगाव शहरात सुरू आहे. कस्तुरबा गांधी यांच्या नावे असणाऱ्या दवाखान्यासाठी शासनाने तब्बल साडेसात कोटी रुपये खर्च केले आहेत. काेविडच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल ताबडतोब सुरू होणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींचे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे. तालुक्यातील सेटलमेंटच्या राजकारणामुळे या दवाखान्याचा बळी जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रश्नी राहुल शिंदे यांनी थेट मार्केट यार्ड परिसरातील आर. आर. आबांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी धाव घेत तासगावला कोणी वाली आहे का? म्हणून लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली. त्याचे पडसाद शहर तालुक्यात उमटले. विविध पक्षांचे राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपोषणस्थळी धाव घेतली.
काँग्रेसचे शरद शेळके, राजीव मोरे, सुमित पाटील, शिवसेनेचे संजय दाजी चव्हाण, दलित संघटनेचे प्रशांत केदार, राष्ट्रवादीचे अमोल नाना शिंदे, ॲड. गजानन खुजट, कमलेश तांबेकर, अभिजित पाटील, इद्रिस मुल्ला, परेश लुगडे, सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, तालुकाध्यक्ष विश्वास पाटील यांनी राहुल शिंदे यांची भेट घेतली.
विश्वास पाटील यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना याबाबत माहिती दिली. तासगावमध्ये आढावा बैठकीच्या निमित्ताने आलेल्या जयंत पाटील यांनी राहुल शिंदे यांच्या आंदोलनाची दखल घेत हे हॉस्पिटल १५ दिवसांच्या आत सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.