एक अत्यंत उपद्व्यापी कार्यकर्ता पोलिसांना डोकेदुखी झाला होता. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था होती. जातीयवादी झेंड्यासह धिंगाणा घालणाऱ्या कार्यकर्त्याला आवरायचे कसे हा प्रश्न होता. रस्त्यावर वाघासारखा आक्रमक होणारा कार्यकर्ता घरवालीसमोर मात्र शेळी व्हायचा. नवऱ्याची वेसण घरवालीच्या हातात गच्च होती. पोलिसांना ही माहिती लागली. घरवालीला गाठले. नवऱ्याचे उपद्व्याप आणि त्यामुळे उद्ध्वस्त होऊ शकणारा संसार याची माहिती दिली. बाईसाहेबांना पटले. मनावरही घेतले. तिने पोलिसांना शब्द दिला. तेव्हापासून कार्यकर्ता घरकोंबडी झालाय. कधीकधी गिरणीतून पिठाचा डबा आणतानाही दिसतोय म्हणे!
फोटो २७ संतोष ०१
आंदोलन, सरकारी स्टाइल...
बिअर शॉपीमधील अवैध दारू विक्रीविरोधात श्रीकांत कोळीगिरी या शिवसैनिकाचे उत्पादन शुल्कसमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या कार्यालयीन वेळेत ठिय्या सुरू आहे. शनिवारी, रविवारी सरकारी नियमाप्रमाणे आंदोलनाला सुट्टी असते. त्याचे सरकारी स्टाइल आंदोलन चर्चेचा विषय झालेय. चर्चा इतकी लांबली की उत्पादन शुल्कला काही ठिकाणी कारवाईदेखील करणे भाग पडले.