सांगली : ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशी जाहिरातबाजी करून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने वर्षभरानंतर आता महाराष्ट्र कुठे आहे, याचे उत्तर द्यावे, असे आवाहन कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले. ग्रेस मार्क देऊनही हे सरकार नापासच आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.मदन पाटील यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी चव्हाण सांगलीत आले होते. यावेळी ते म्हणाले की, सरकार असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल त्यांना कोणतेही गांभीर्य नाही. प्रशासनावर, पोलीस यंत्रणेवर त्यांचा अंकुश नाही. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सरकारची ठोस भूमिका नाही. पुरावे हाती लागूनही सरकारला यात काही करता आले नाही. सनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयी त्यांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. साहित्यिक, विचारवंतांनी त्यांचे पुरस्कार परत देण्यास सुरुवात केली आहे. इतकी गोंधळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुष्काळी मदत याबाबत आवश्यक निर्णय घेतलेले नाहीत. साखर कारखाने व ऊस दराबाबतही तातडीने निर्णय घेणे गरजेचे होते. कारखाने कोणाचे आहेत, हे न पाहता निर्णय घ्यायला हवेत. सरकारच्या एक वर्षाच्या कालावधिचा विचार करता ग्रेस मार्कस् देऊनही हे सरकार पास होणार नाही. सरकारच्या धोरणांचा अंदाज आता लोकांना आला आहे. त्यामुळे या सरकारविषयी शेतकरी, सर्वसामान्य जनतेत नाराजी आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडल्याने आता पूर्णवेळ गृहमंत्र्यांची गरज राज्याला आहे. विरोधक म्हणून आम्ही सक्षमपणे आमची भूमिका बजावत आहोत. आमचे सरकार असताना कोणत्याही गोष्टीवर भाजप व शिवसेना ज्या पद्धतीने स्टंटबाजी करीत होती, तशी स्टंटबाजी करण्याची आम्हाला गरज नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)उद्योजकांना माफी, शेतकऱ्यांना नाहीजिंदाल कंपनीला साडेआठशे कोटी रुपयांची माफी एका क्षणात देणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना विचार करावा लागत आहे. कोणतेही आर्थिक नियोजन नसताना, एलबीटीला माफी दिली जाते. महापालिकांचे निम्मे उत्पन्न घटले तरीही सरकारला सामान्य जनतेशी काही देणेघेणे नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली. शिवसेनेच्या वेगळ्या भूमिकाएकीकडे सत्तेतही रहायचे आणि दुसरीकडे सरकारला बाहेरून विरोधही करायचा, अशा वेगवेगळ््या भूमिका शिवसेना घेत आहे. ते सत्तेत असल्याने त्यांना सरकारच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारावी लागेल, असे चव्हाण म्हणाले.मध्यावधीचेच संकेतगेल्या काही दिवसांपासून सत्तेतील दोन्ही पक्ष एकमेकांना काळे फासण्याचा जो प्रयत्न करीत आहेत, त्यावरून त्यांची दिशा कळत आहे. सरकार फार दिवस टिकणार नाही, याचेच हे संकेत आहेत.
कुठे आहे आता महाराष्ट्र आपला?
By admin | Updated: October 25, 2015 23:29 IST