तासगाव तालुक्यातील ‘सेटलमेंट’चे राजकारण मोडीत काढण्याचे काम शिवसेनेचे पदाधिकारी करतील, असा विश्वास यावेळी घोरपडे यांनी व्यक्त केला.
सावर्डे (ता. तासगाव) ग्रामपंचायतीच्या वतीने शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी घोरपडे बोलत होते.
यावेळी घोरपडे म्हणाले, तासगाव तालुक्यातील नेत्यांनी खोटे बोलून राजकारण करण्याची परंपरा सुरू केलेली आहे. या पुढील काळात परंपरा मोडून काढायला पाहिजे, तसेच तालुक्यातील लोकांना भविष्यात नीतीवान राजकारण कसे करायचे शिकवण्याची गरज आहे.
बानगुडे-पाटील म्हणाले, तासगाव तालुक्यातील काही गावांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे; परंतु स्थानिक आमदार या गावामध्ये निधी देताना दुजाभाव करतात. अशा तक्रारी कार्यकर्ते करत आहेत. यापुढील काळात अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. सावर्डे ग्रामपंचायतीसाठी मंजूर झालेला नऊ लाखांचा आमदार फंड मिळाला नसला तरी चिंता करायचे कारण नाही. यापुढील काळात नऊ नव्हे, तर गावाला नव्वद लाख फंड मिळवून देऊ.
जिल्हाप्रमुख संजय विभूते म्हणाले, तासगाव तालुक्यातील आमदार-खासदारांचे ‘सेटलमेंट’चे राजकारण मोडून काढण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे.
सावर्डेचे सरपंच प्रदीप माने म्हणाले, या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अगोदर तालुका भयमुक्त करण्याची नितांत गरज आहे. यासाठी पक्ष नेतृत्वाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावे. पक्षाने आदेश दिला तर यापुढील काळात निवडणुका स्वबळावर लढवू. जिल्ह्यातील सर्व सत्ताकेंद्रावर भगवा फडकवू.
धनाजी सूर्यवंशी यांनी प्रास्तविक केले. अरुण खरमाटे यांनी आभार मानले.