लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महाराष्ट्र शासनाने बजेटमध्ये महिलांच्या कल्याणकारी मंडळासाठी २५० कोटी रुपये तरतूद केली, मात्र या मंडळामार्फत अजूनही मोलकरीण महिलांची नोंदणी सुरू नाही. त्यामुळे या महिलांना मदत मिळणार तरी कधी, असा सवाल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कॉ. शंकर पुजारी यांनी उपस्थित केला.
सांगली जिल्हा निवारा संघाच्या कार्यालयात मेळावा पार पडला. यावेळी पुजारी म्हणाले की, मंडळामार्फत कोणत्या कल्याणकारी योजना राबविल्या जाणार आहेत. याबद्दल शासनाकडून स्पष्टता नाही. तरीसुद्धा मोलकरीण महिलांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन नावाची नोंदणी करावी व स्वतःच्या ओळखपत्राचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले.
सरचिटणीस कॉ. सुमन पुजारी म्हणाल्या की, महाराष्ट्र शासनाने अनेक वर्षांपूर्वी घोषित केले होते की, साठ वर्षांनंतर मोलकरीण महिलांना पेन्शन सुरू करण्यात येईल. परंतु त्या निर्णयाची अजूनही अंमलबजावणी केलेली नाही. याबाबत शासनाने कार्यवाही न केल्यास आंदोलन करू. यावेळी कॉ. वर्षा गडचे, कॉ. विजय बचाटे, रेखा कांबळे, उषा तलेकुटी, नसरीन गवंडी, अफरीन कोतवाल, अंजना शिंदे, स्नेहा सुतार आदी उपस्थित होते.