शिराळा
: शिराळा तालुक्यातील फक्त १३ नागरिकांना ऑनलाइन नोंदणीमुळे; तर तालुक्याबाहेरील ३३४ जणांना कोरोना प्रतिबंधक लस मिळाली. नोंदणी केलेले नागरिक न आल्याने तीन डोस वाया गेले. तसेच ५० डोस शिल्लक राहिले आहेत. यामुळे जर तालुक्यातील नागरिकांना लस मिळत नसेल तर ही ऑनलाइन नोंदणी बंद करावी तसेच नोंदणी करून जे नागरिक येत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दोन दिवस १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयात लस देण्यात येणार होती. यामध्ये ऑनलाइन नोंदणीत तालुक्याच्या बाहेरील म्हणजे सांगली शहर, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी येथे गाड्या घेऊन येऊन लस घेतली; मात्र यातील ५३ नागरिक आलेच नाहीत. त्यामुळे ५० लस शिल्लक राहिल्या आहेत तर तीन लस वाया गेल्या.
तालुक्यातील अनेक जण ऑनलाइन नोंदणी शिवाय लस मिळणार नसल्याने परत गेले. येथील नागरिकांना लस मिळत नसेल तर ही ऑनलाइन पद्धत बंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शिल्लक ५० लसीचे काय करायचे याबाबत कोणताही आदेश नाही. जर ऑनलाइन नोंदणी करून नागरिक येत नसतील तर अशा नागरिकांमुळे इतरांना लस मिळत नाही. यासाठी अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. ही शिल्लक लस ग्रामीण भागातून येणाऱ्या वयोवृद्ध, आजारी, अपंग आदींना द्यावी.