लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यातील चांदोली परीसरातील आरळापैकी भाष्टेवस्ती व कोकणेवाडी या वस्ती माळीणसारख्या दुर्घटनेच्या छायेखाली आहे. वाडीलगतच्या डोंगरांना भेगा पडून डोंगर खचू लागले आहेत. ११ नोव्हेंबर २०१९ रोजी याबाबत प्रशासनाला माहिती दिली होती मात्र अद्याप ठोस निर्णय झाला नाही. यामुळे शासन येथील नागरिकांचे स्थलांतर करणार का? असा प्रश्न उभा ठाकला आहे.
या दोन ठिकाणची माहिती मिळाल्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये तहसीलदार गणेश शिंदे, वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे, कनिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी या परिसराची पाहणी केली होती.
यावेळी भूस्तर भाग, भौगोलिक परिस्थिती, खडकाची रचना, पाण्याचा निचरा याची तपासणी केली. यामध्ये कोकणेवाडी डोंगर लाल मातीने भरला आहे. दगडाची झीज झाली आहे. मुरूम मातीची धूप झाली आहे. हा थर जवळपास १० ते २० फूट खोल आहे. तो कठीण दगडापासून सुटलेला आहे. तसेच या ठिकाणी असणाऱ्या ओढ्यामुळे या डोंगराची झीज वेगाने होत आहे. ओढ्यातील पाण्यामुळे माती व मुरूम वाहून जात आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाली की डोंगराचा भाग केव्हाही सुटू शकतो. हा भाग सुटल्यास डोंगर पायथ्याशी असलेल्या चार घरांना व शाळेस मोठा धोका आहे.
भाष्टे वस्तिी येथे दोन ओढ्याच्या मध्ये जी ६ घरे व कोकणेवाडी येथील १२ घरे यातील नागरिकांचे स्थलांतर होणे आवश्यक आहे. या कुटुंबांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणे आवश्यक आहे अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोट
कोकणेवाडी येथे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. येथील रस्ता खचला आहे. भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने येथे दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्याबाबत शासकीय पातळीवर लवकरच बैठकीचे आयोजन करणार आहे. त्याबाबत नागरिकांशी चर्चा केली.
- आमदार मानसिंगराव नाईक