लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरज शहरातील प्रलंबित ड्रेनेज लाईनचे काम व खराब रस्त्यांची दुरुस्ती नेमकी होणार तरी कधी, असा सवाल जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी मंगळवारी महापौरांसमोर उपस्थित केला.
रस्ते प्रश्नावर जनता दलाच्यावतीने महापौरांना निवेदन देण्यात आले. मिरज शहरातील प्रलंबित ड्रेनेज आणि खराब रस्त्यांच्या कामाला पावसाळ्यानंतर युद्धपातळीवर सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी शिष्टमंडळास दिले.
जनता दलाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मिरज शहर व परिसरात ड्रेनेज आणि पाणीपुरवठा योजनेमुळे खणलेल्या खड्ड्याने शहराला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. खराब रस्त्यांमुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत. जनता दलाने गेले पंधरा दिवस मोहीम उघडून शहरातील अनेक समस्यांचा सर्व्हे करून नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांबाबत आढावा घेतला. महापालिकेकडून या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. खराब रस्त्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्ते व ड्रेनेजच्या मूलभूत सोयींबाबत दिरंगाई करू नये. नागरिकांचा हा प्रश्न महापालिकेने तातडीने सोडवावा.
महापौर सूर्यवंशी म्हणाले की, काही रस्त्यांच्या निविदा निश्चित केल्या असून, काही पूर्णत्वाच्या प्रक्रियेमध्ये आहेत. अपूर्ण ड्रेनेज आणि पाणीपुरवठा योजनेबाबत संबधित ठेकेदाराला तात्काळ काम पूर्ण करण्याच्या सूचना देत आहे.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. के. डी. शिंदे, ॲड. शब्बीर आलासे, ॲड. फैय्याज झारी, मिरज मेडिकल असोसिएशनचे डॉ. अशोक कुलकर्णी, शेतकरी संघटनेचे संभाजीराव मेंढे, प्रायमरी स्कूल संघटनेच्या अंजुमबी जमादार, रिक्षा वाहतूक संघटनेचे शिवाजी जाधव, मन्सूर नदाफ, शहर नाभिक संघटनेचे विजय अस्वले, शशिकांत गायकवाड, जनार्धन गोंधळी, प्रा. सलीम सय्यद, शाम कांबळे, प्रा. अरुण पाचोरे, विजय पाठक, सायरा मलिदवाले आदी उपस्थित होते.