लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : प्रतापसिंह उद्यानातील एक जागा भाडेतत्त्वावर देण्याचा विषय गेल्या आठवड्यात चांगलाच गाजला. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांसह पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला जोरदार विरोध केला. सांगलीचे वैभव वाचले पाहिजे, असा गळाही काढला. पण गेल्या अडीच वर्षांत याच भाजपला कधी प्रतापसिंह उद्यानाची आठवण तरी झाली होती का, असा प्रश्नही पडतो. आता मात्र त्यांचे पूतना मावशीचे प्रेम उफाळून आले आहे. किमान उर्वरित अडीच वर्षात तरी या उद्यानाला गतवैभव प्राप्त व्हावे, अशी आशा उद्यानप्रेमींना आहे. खरंच कधी काळी प्रतापसिंह उद्यान सांगलीचे वैभव होते. या उद्यानात सिंहाची डरकाळीही ऐकू येत होती. आसपासच्या जिल्ह्यातून लोक या उद्यानाला भेट देत. सुट्टीच्या दिवशी तर हे उद्यान आबालवृद्धांनी हाऊसफुल्ल असे. पण काळाच्या ओघात उद्यानाचे हे वैभव संपुष्टात आले. जंगलाचा राजा, इतर पशुपक्षी निघून जाताच उद्यान भकास झाले. आता उद्यानाचा एका भागात काही प्रमाणात हिरवळ, मुलांसाठी खेळणी, बाकडी आहेत. तर दुस-या बाजूला पशुपक्ष्यांसाठी तयार केलेल्या पिंज-यांचा सांगाडा.
महापालिका प्रशासनाने उत्पन्नवाढीच्या नावाखाली उद्यानातील एक पडीक जागा ई-लिलावने देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेकांना उद्यानाची आठवण झाली. सांगलीचे वैभव, इतिहासाचे दाखले देत त्यांनी याला विरोध केला. त्यांचा विरोध योग्यच होता. यात सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आघाडीवर होते. पण मग अडीच वर्षाच्या सत्ताकाळात या मंडळींना उद्यानाच्या गतवैभवाची आठवण का झाली नाही, असा प्रश्न पडतो. फार तर उद्यान सुशोभीकरणाबाबत काहींनी पत्रे, निवेदन दिलीही असतील. पण पाठपुरावा का झाला नाही? महासभेत भाजप, काँग्रेसच्या नगरसेवकांनी बालपणींच्या आठवणींना उजाळा देत ई-लिलावाला विरोध केला. कुणी इतिहासाची पाने उलघडली. पण हीच मंडळी पूर्वी कधी उद्यानाचे वैभव परत यावे यासाठी फारसे बोलताना दिसली नाहीत. या निमित्ताने का होईना आता उद्यानाच्या सुशोभीकरणाचा चर्चा झाली आहे. किमान भाजपच्या उर्वरित अडीच वर्षात तरी उद्यानाला गतवैभव प्राप्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, हेही नसे थोडके!
चौकट
काँग्रेसचे दिवंगत नेते मदनभाऊ पाटील यांनी मुख्यमंत्री निधीतून या उद्यानासाठी १ कोटीची तरतूद केली होती. त्यातून वाॅकट्रक, खेळणी, कंपाउंड भिंतीची कामे मार्गी लागली. तत्कालीन काँग्रेस सत्ता काळात साडेतीन कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला होता. त्यात ॲम्पी थिएटर, मिरर इमेज, आर्टीफिशल संग्रहालयाचाही समावेश होता. पण गेल्या अडीच वर्षात उर्वरित कामे होण्यासाठी कुणीच प्रयत्न केले नाहीत. भाजपच्या सत्ताकाळात १०० कोटींचा निधी आला होता. त्यातूनही प्रतापसिंह उद्यानासाठी तरतूद होऊ शकली असती. पण रस्ते व गटारी हाच विकास मानण्याच्या वृत्तीमुळे उद्यानाकडे ना सत्ताधाऱ्यांचे लक्ष गेले ना विरोधकांचे.
फोटो:- शहरातील प्रतापसिंह उद्यानाचा कचरा कोंडाळा झाला आहे. तेथील पिंजऱ्यांनाही गंज चढला असून झुडपेही उगविली आहेत. (छाया : नंदकिशोर वाघमारे)