मिरज : मिरजेत विसर्जन मिरवणूक मार्गावर विविध पक्ष, संघटनांतर्फे स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. शुक्रवारी उभारणी पूर्ण झाली. यावर्षी मंडळांच्या स्वागत कमानींवर ‘बाहुबली’च्या रूपातील गणेश, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, बसवेश्वर व शिवछत्रपतींची प्रतिमा साकारण्यात आली आहे. गणेशोत्सवाचे आकर्षण असणाऱ्या या स्वागत कमानी विद्युत रोषणाईने झगमगत आहेत. अनंतचतुर्दशीदिवशी मिरवणूक मार्गावर उभारण्यात येणाऱ्या उंच व भव्य स्वागत कमानी ही मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीची वैशिष्ट्ये आहेत. मिरवणूक मार्गावर विश्वशांती मंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मराठा महासंघ, शिवसेना, हिंदू एकता आंदोलन, छत्रपती शिवाजी चौक मंडळ, धर्मवीर संभाजी तरुण मंडळ, एकता मित्र मंडळ व विश्वश्री पैलवान मंडळाच्या प्रमुख कमानींसह विविध ठिकाणी सुमारे १७ लहान-मोठ्या कमानी उभारण्यात येतात. विविध देखावे साकारलेल्या या स्वागत कमानी भव्य व आकर्षक रोषणाईने सजल्या आहेत. अनंतचतुर्दशीसाठी स्वागत कमानींची उभारणी पूर्ण झाली आहे. यावर्षी स्वागत कमानींवर ‘बाहुबली’चा प्रभाव आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ व संभाजी तरुण मंडळाच्या कमानींवर ‘बाहुबली’च्या रूपात खांद्यावरून शिवलिंग नेणाऱ्या गणेशाची भव्य प्रतिमा साकारली आहे. मराठा महासंघाच्या कमानीवर माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचीही प्रतिमा आहे. शिवाजी चौक मंडळाच्या कमानीवर तांडव करणाऱ्या शंकराची प्रतिमा साकारण्यात आली आहे. हिंदू एकता आंदोलनच्या कमानीवर माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची प्रतिमा आहे. शिवसेनेच्या स्वागत कमानीवर उध्दव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे व शिवछत्रपतींची प्रतिमा आहे. एकता तरुण मंडळातर्फे स्टेशन रस्त्यावर उभारलेल्या कमानीवर दुष्काळ व शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा देखावा साकारण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष तात्या परदेशी यांनी सांगितले. मनसेच्या स्वागत कमानीवर लाल किल्ल्याची प्रतिमा आहे. विश्वशांती मंडळाच्या स्वागत कमानीवर महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा आहे. (वार्ताहर)नव्या स्वागत कक्षाला परवानगी नाहीशहरातील अनेक गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती उंच व मोठ्या आकाराच्या आहेत. उंच गणेशमूर्ती नेताना व वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी कमानींची उंची वाढविण्यात आली आहे. स्वागत कमानीवरील देखाव्यांना पोलिसांची परवानगी घेण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीला विलंब होत असल्याने कोणत्याही नवीन कमानी व स्वागत कक्षाला परवानगी देण्यात आलेली नाही.
स्वागत कमानींवर ‘बाहुबली’
By admin | Updated: September 26, 2015 00:23 IST