लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना लाॅकडाऊनमुळे बहुतांश भाजीपाला बाजारपेठा बंद असल्याने उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. समडोळीतील शेतकऱ्याने अडीच एकर ढबूवर तणनाशक फवारले, तर एकाने टोमॅटोला दर नसल्याने ते काढून शेतातच कुजण्यासाठी टाकले. भाजीपाला वाहतूक ठप्प असल्याने नुकसान होत आहे.
सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी समडोळी, आष्टा परिसरातील भाजीपाला उत्पादकांची भेट घेऊन माहिती घेतली असता हा प्रकार समोर आला. त्यानंतर पवार यांनी शासनाच्या धोरणाबद्दल संताप व्यक्त केला. सचिन पाटील या शेतकऱ्याने एक एकर टोमॅटोचे पीक घेतले आहे. बाजारपेठ बंद असल्याने कवडीमोल दराने तो विकावा लागत आहे. पिकलेले टोमॅटो व ढबू पुढे जात नसल्याने शेतातच कुजण्यासाठी टाकले आहेत. समडोळीच्या जिवंधर मगदूम यांनी अडीच एकर क्षेत्रावर ढबू पीक घेतले होते. पुणे, मुंबई, हैदराबाद, दिल्लीला ढबू पाठविण्याचे नियोजन होते; पण बाजारपेठा बंद झाल्याने मगदूम यांनी अडीच एकर पिकावर तणनाशक फवारले. त्यांचे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पृथ्वीराज पवार म्हणाले, सांगली शहरासह अनेक ठिकाणी भाजीपाला बाजार बंद आहेत. भाजीपाल्याची खरेदी करण्याची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारावी. सरकारने शासकीय रुग्णालये, शिवभोजन थाळी, कोरोना सेंटर, खासगी दवाखान्यातील खानावळी, लष्करी तळ, पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि जेल व सरकारी भोजन व्यवस्था असलेल्या ठिकाणी हा भाजीपाला पाठवावा. नुकसान झाल्याने शेतकऱ्याच्या गळ्याला फास लागता कामा नये. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मतदारसंघात इतकी विदारक स्थिती आहे. ते राज्यातील अत्यंत वजनदार मंत्री आहेत. त्यांनी यात लक्ष घालावे. अन्यथा आम्हाला जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर भाजीपाला आणून टाकावा लागेल, असा इशारा दिला.