सांगली : सध्या महापालिका क्षेत्राचा पॉझिटिव्हिटी रेट १७ ते २० टक्क्यांच्या घरात असल्याने निर्बंध कायम केले आहेत. येत्या १२ जुलैपासून तिसऱ्या स्तरातील सवलती व्यापारासाठी देण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यापाऱ्यांना दिले. या आश्वासनानंतर दुकाने उघडण्याचे आंदोलन स्थगित केल्याची माहिती व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी दिली.
जिल्हाधिकारी आणि व्यापारी एकता असोसिएशनची बैठक शनिवारी झाली. सातत्याने बदलणारे नियम आणि लॉकडाऊनला कंटाळून असोसिएशनने आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने चर्चेसाठी व्यापाऱ्यांना निमंत्रित केले होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, शासनाच्या आदेशानुसार दोन आठवड्यांचे प्रमाण काढले तरी जिल्हा अद्याप स्तर ३ मध्ये येण्यास पात्र नाही. शहरी विभागातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर १७ ते २० टक्क्यांच्या घरात आहे. त्यामुळे तोसुद्धा प्रयत्न करता येत नाही. कोणतीही शिथिलता द्यायची असेल, तर हे सगळे शासनाला कळवून परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जोपर्यंत ही स्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत कोणतीही मुभा देता येत नाही.
असोसिएशनतर्फे समीर शहा व अन्य सदस्यांनी अडचणी व आतापर्यंत केलेले सहकार्य याचा पाढा वाचला. प्रशासन जर सवलत देणार नसेल तर व्यापारीसुद्धा आता थांबू शकत नाहीत, अशी भूमिका घेतली. अखेर प्रदीर्घ चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या १२ जुलैपासून सर्व निर्बंध उठवून स्तर तीनच्या सुविधा देण्यात येतील, असे आश्वासन दिले. ते म्हणाले की, सवलतींबाबतचे आदेश हे गुरुवारी किंवा शुक्रवारी काढण्यात येतील. त्यासाठी या आठवड्यात प्रशासन जिल्हा स्तर ३ मध्ये येण्यास युद्धपातळीवर प्रयत्न करेल. त्यानंतर कोणतेही निर्बंध घातले जाणार नाहीत.
समीर शहा यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासन दुकाने सुरू करण्याबाबत सकारात्मक आहे. नुकसानाची बाजू त्यांना समजत आहे. दुकाने बंद असल्याबाबत प्रशासनालासुद्धा वाईट वाटत आहे. जे लोक अत्यावश्यक सेवेत आहेत, त्यांनीही सेवेत नसणारी दुकाने सुरू होण्यासाठी सहकार्याची भूमिका व प्रयत्न ठेवावेत, असे आवाहन आम्ही असोसिएशनतर्फे करत आहोत.
चौकट
नागरिकांनीही संयम पाळावा
नागरिकांनीही अनावश्यक गर्दी करणे टाळले पाहिजे. दुकाने सातत्याने बंद राहिल्याने व्यापारी समाज मोठ्या संकटात आहे. त्यामुळे विनाकारण फिरुन रुग्णसंख्या वाढवू नये, असे आवाहन आम्ही करत आहोत. प्रशासनाला आतापर्यंत केलेले सहकार्य वाया जाऊ नये म्हणून असोसिएशनने आंदोलन स्थगित केले आहे.