लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी नियमितीकरणाला राज्य शासनाने मुदतवाढ दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. महसूल व महापालिकेकडे गुंठेवारीधारकांचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहे. ते मार्गी लावण्यासाठी लवकरच आयुक्तांची भेट घेऊन पाठपुरावा करू, अशी ग्वाही जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी दिली.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त जनता दलच्या वतीने महापालिका क्षेत्रातील गुंठेवारीधारकांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी प्रा. पाटील बोलत होते. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रा. पाटील म्हणाले, गुंठेवारीला नियमितीकरणाला दिलेल्या मुदतवाढीने गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या संधीचा लाभ गुंठेवारीधारकांनी घ्यावा. अनेकांनी महानगरपालिकेकडे रीतसर दंडाची रक्कम भरून नियमितीकरणाचे प्रस्ताव दाखल केलेले आहेत. परंतु त्यांना अद्याप परवाने मिळालेले नाहीत. काहींच्या फायली गहाळ झाल्या आहेत, तर काही प्रस्तावाबाबत अधिकाऱ्यांकडून चालढकल केली जात आहे. याबाबत लवकरच आयुक्तांची भेट घेऊन प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. ज्यांनी अद्याप प्रस्ताव दाखल केलेले नाहीत, त्यांनी जनता दलाच्या शहरातील कार्यालयाशी संपर्क साधावा.
ज्या गुंठेवारीधारकांनी पूर्वी जमिनीची खरेदी केली आहे, त्यावेळच्या बाजारभावानुसार २५ टक्के रक्कम भरण्याची तयारी यावेळी लाभधारकांनी दर्शविली आहे. तसेच २५ टक्के आकारणी ही महसूल व महापालिका प्रशासनाने करावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. या मेळाव्यास अॅड. फय्याज झारी, कुपवाड सोसायटीचे उपाध्यक्ष सचिन जमदाडे, जनता दल विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुमित पाटील, अशोक मोहिते, दीपक सातपुते, बाबासाहेब चिंचवाडे, अहिंसक धोतरे, रमेश सायमोते उपस्थित होते. जनार्दन गोंधळी यांनी प्रास्ताविक, तर शशिकांत गायकवाड यांनी स्वागत केले. यावेळी अॅड. के. डी. शिंदे, डॉ. जयपाल चौगुले, प्रेमचंद पांड्याजी आदींनी मार्गदर्शन केले.