लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
: शिराळा पाटबंधारे विभागांतर्गत असणाऱ्या मोरणा मध्यम प्रकल्पामध्ये फक्त ९ टक्केच पाणी साठा शिल्लक राहिल्याने शुक्रवारी सकाळी ६ वाजता वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडण्यात आले. हे पाणी सकाळी ११ वाजता मोरणा धरणामध्ये दाखल झाले. यामुळे शेतकरी, नागरिकांना दिला मिळाला आहे.
आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे शेतकरी, नागरिकांनी मागणी केली होती. त्यानुसार हे पाणी मोरणा मध्यम प्रकल्पात सोडण्यात आले.
शिराळा शहरासह आसपासच्या सहा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोरणा मध्यम प्रकल्पामध्ये ९ टक्के पाणीसाठा होता.
आमदार नाईक यांनी सूचना केल्याप्रमाणे
कार्यकारी अभियंता वारणा कालवे विभाग इस्लामपूर डी. डी. शिंदे, कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे जोती देवकर, उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे, शाखा अधिकारी सी. बी. यादव, शाखा अभियंता एस. डी. देसाई, एस. के. पाटील यांनी नियोजन करून सुरुवातीला अंत्री तलावात पाणी सोडण्यात आले होते.
कोट
शेतकऱ्यांनी काटकसरीने पाणी वापर आणि उपसाबंदीचे काटेकोरपणे पालन करावे. एप्रिल महिन्यातच पाण्याची बिकट परिस्थिती आहे. अंत्री तलावात वाकुर्डे योजनेचे पाणी सोडून २३ टक्के तलाव भरला आहे. या तलावातील पाणी वापर हा काटकसरीने करावा म्हणजे जवळपास एक महिना पाणी पुरेल.
- लालासाहेब मोरे, उपविभागीय अभियंता.