लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापुराचा फटका महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागालाही बसला आहे. नदीपात्रातील जॅकवेल व पम्पगृह पाण्यात गेल्याने, गेल्या चार दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. सोमवारी नगरसेविका वर्षा निंबाळकर, सोनाली सागरे यांनी स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. शहरातील अनेक नगरसेवकही स्वत:च टँकर आणून पाणी देण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेने १५ टँकर उपलब्ध करून दिले आहेत.
महापुरामुळे महापालिकेच्या जॅकेवल पाण्याखाली गेले आहे. पम्पिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे महापालिकेने शनिवारपासून शहरातील पाणीपुरवठा बंद केला. त्याचा फटका सांगली व कुपवाड या दोन शहरातील नागरिकांना बसला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी वाॅटर एटीएमवर गर्दी केली आहे. मार्केट यार्डातील कृषी उत्पन्न बाजार समितीने मोफत पाणी वाटप सुरू केला आहे. त्यात आता नगरसेवकही नागरिकांच्या मदतीला धावले आहेत.
काँग्रेसच्या नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी स्वखर्चाने पाणीपुरवठा सुरू केला आहे. प्रभाग क्रमांक १० मधील वडर कॉलनी, नवीन वसाहत, भीमनगर, उत्तर शिवाजीनगर, अच्युतराव कुलकर्णी प्लाॅट, वांगीकर प्लाॅट, दसरा चौक, शिलंगण चौक, बालाजी मिल रोड, मिशन कंपाउंड, मालगावे डेअरी परिसर, कलानगर या परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला, तर सोनाली सागरे यांनी विनायकनगर, अष्टविनायकनगर या परिसरात स्वखर्चाने टँकर उपलब्ध करून दिला आहे.