अहमदनगर : शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी रविवारी दुपारी फुटली. यामुळे पाणी पुरवठा पूर्णत: विस्कळीत झाला. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. पाणी उपसा पूर्णपणे बंद असल्याने सोमवारी शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.शहर पाणी पुरवठा योजनेची कार्यरत असलेली सातशे एम. एम. व्यासाची जुनी मुख्य जलवाहिनी रविवारी दुपारी फुटली. देहरे गावाजवळच्या उड्डाणपुलाच्या बाजुने जाणारी ही जलवाहिनी हवेच्या आणि पाण्याच्या दाबाने तडा जावून फुटली आहे. महापालिकेने जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतलेले आहे. ही जलवाहिनी फुटल्याने या जलवाहिनीद्वारे मुळानगर येथून होणारा पाणी उपसा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शहर पाणी वितरण व्यवस्थेच्या टाक्या भरता येणार नाहीत. परिणामी सोमवारी (दि.९) रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भाग आणि उपनगरात पाणी पुरवठा होणार नाही, असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. फुटलेल्या जलवाहिनीचा २० फुटाचा तुकडा काढण्याचे काम रात्री दहा वाजता संपले होते. त्या जागी नवीन तेवढाच तुकडा बसविण्याचे काम मध्यरात्री सुरू झाले असून सोमवारी पहाटे ते पूर्ण होणार आहे. ३५ कर्मचारी दुरुस्तीचे काम करीत असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातील अभियंता महादेव काकडे यांनी दिली.(प्रतिनिधी)
जलवाहिनी फुटली
By admin | Updated: May 8, 2016 23:52 IST