वांगी : कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग व शेळकबाव येथे बुधवारी वाळू चोरीचा उघडकीस आली. प्रशासनाने ट्रॅक्टर व टेम्पो जप्त केला आहे.
प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी नदीला जाणारे सर्व रस्ते चर पाडून बंद केले. नदीपात्रातील पडलेल्या खड्ड्याचे पंचनामे करून संबंधित वाळूचोरांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची पथके तयार करून गस्त सुरू केली आहे. अ
गस्त पथकातील वैभव तारळेकर व भारत वाघमोडे बुधवारी पहाटे वडियेरायबाग येथे येरळा नदीपात्राकडे गेले असता त्यांना नदीपात्रातून ट्रॅक्टर ट्रॉलीतून वाळू भरून येत असताना दिसला. कर्मचाऱ्यांनी तो ट्रॅक्टर अडवला असता हरजित शेळके (रा. वडियेरायबाग) यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले. त्या ट्रॅक्टरवर कारवाई करून तो कडेगाव तहसीलदार कार्यालयात जमा केला आहे.
या कारवाईनंतर पथक शेळकबाव येथे पोहोचले असता एक टेम्पो येरळा नदीपात्रातून शेळकबाव-वांगी रस्त्यावर येताना दिसून आला. त्यास अडविले असता यामध्ये वाळू भरल्याचे दिसून आले. हा टेम्पो अक्षय कदम (रा. शेळकबाव) याचा आहे. त्यावर कारवाई करून तोही तहसीलदार कार्यालयात जमा केला आहे.