सांगली : जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून आपला उल्लेख केला जातो. त्यामुळे ही लोकशाही अधिक सुदृढ करण्याची प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.
निकोप लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येक मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे, असे
प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. विश्वास माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार हा अमूल्य अधिकार आहे. सशक्त लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदार नोंदणी करून सजगतेने निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे. ज्यांची नावे मतदार यादीत नोंद नाहीत, अशांनी नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे. शहरी भागातील मतदानाची टक्केवारीही वाढावी, यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी एम. बी. बोरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे,
उपजिल्हाधिकारी विजया यादव, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल आदी उपस्थित होते.