लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व राज्य शासनाने घातलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर विटा शहराचे ग्रामदैवत श्री नाथ अष्टमीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष, माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांनी दिली.
सदाशिवराव पाटील म्हणाले, विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. प्रशासनाने संचारबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यात्रा, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम हे रद्द झाले आहेत. या अनुषंगाने विटानगरीचे आराध्य दैवत श्री नाथ मंदिर येथे सोमवार, दि. ३ मे रोजी रात्री १२ वाजता जन्मकाळ व मंगळवारी नैवेद्य असा कार्यक्रम होणार होता. मात्र, प्रशासनाच्या आदेशामुळे हा कार्यक्रम रद्द झाला आहे. तरी मंदिरात गर्दी करू नये. सर्वांनी हा सण आपापल्या घरीच उत्साहात साजरा करावा.
ग्रामदैवत श्री नाथदेव मंदिराचे पुजारी गुरव व मानकरी यांच्याहस्ते जन्मकाळाची पूजा ही परंपरेनुसार व रीतीरिवाजाप्रमाणे होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची विट्याची श्री नाथ अष्टमी यात्रा रद्द केली आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे व विटा शहर कोरोनामुक्त होऊन पहिल्यासारखे समृद्ध व्हावे, अशी अपेक्षाही माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांनी व्यक्त केली.