सांगली : महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी प्रभाग १९ मधील नगरसेवक विनायक रमेश सिंहासने यांची बुधवारी निवड करण्यात आली. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. त्यानंतर भाजपच्या गटनेतेपदी युवराज बावडेकर यांची निवड करण्यात आली. नव्या सदस्यांना संधी देण्यासाठी बावडेकर यांना राजीनामा देण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिले होते. त्यानुसार बावडेकर यांनी गटनेते व सभागृह नेते पदाचा राजीनामा महापौर गीता सुतार व पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैसाळकर यांच्याकडे सुपूर्द केला. बुधवारी नवा नेता निवडीसाठी आ. गाडगीळ यांच्या कार्यालयात नगरसेवकांची बैठक झाली.
या बैठकीला आ. सुरेश खाडे, कोअर कमिटीचे सदस्य शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, मकरंद देशपांडे, सुरेश आवटी, महापौर गीता सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह पक्षाचे ४३ नगरसेवक उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडून बंद लिफाफ्यातून विनायक सिंहासने यांचे नाव पाठविले होते. शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. त्याला उपमहापौर देवमाने वगळता इतर नगरसेवकांनी पाठिंबा दिला. निवडीनंतर सिंहासने यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी दुपारी महापालिकेत गटनेतेपदाचा पदभार स्वीकारला.
चौकट
निवड सार्थ ठरवू
भाजपच्या नेत्यांनी मोठ्या विश्वासाने गटनेतेपदाची धुरा दिली आहे. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन सभागृहाचे कामकाज पार पाडू. भाजपची सत्ता आल्यापासून महापालिकेच्या विकासाला गती आली आहे. उर्वरित अडीच वर्षांत जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही नूतन गटनेते विनायक सिंहासने यांनी दिली.
फोटो ओळी - महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी विनायक सिंहासने यांची निवड झाल्यानंतर त्यांचा आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, दिनकर पाटील, सुरेश आवटी, पांडुरंग कोरे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.