फोटो ओळ : कसबे डिग्रज येथील बंधाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले व अभिनंदन चौगुले उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील कृष्णा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे, कचरा साचला होता. त्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झालेला होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे कसबे डिग्रजचे जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांच्या पुढाकाराने या बंधाऱ्याची जेसीबीच्या सहाय्याने ग्रामस्थांनी स्वच्छता केली.
गत आठवड्यात पडलेल्या पावसाने बंधाऱ्यात मोठमोठी झाडे आणि कचरा अडकलेला होता. त्याचा बंधाऱ्याला धोका निर्माण झाला होता. या बंधाऱ्यावर सुमारे पस्तीस हजार एकर शेती आणि २३ गावांच्या नळपाणी योजना अवलंबून आहेत. मोठ्या प्रमाणात कचरा अडकल्याने याठिकाणी दुर्गंधी पसरलेली होती. त्यामुळे हा बंधारा स्वच्छ करावा. अशी मागणी नागरिकांमधून होत होती. परंतु, पाटबंधारे विभागाने या प्रकाराकडे लक्ष दिले नाही.
या परिसरातील काही शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांना बंधाऱ्याच्या दुरवस्थेबाबत माहिती दिली. पावसाने उघडीप दिल्यानंतर विशाल चौगुले यांनी जेसीबीच्या माध्यमातून या बंधाऱ्याची स्वच्छता केली. या उपक्रमाचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.