विटा : खानापूर तालुक्यातील पंचलिंगनगर (भाळवणी) येथे चंदन चोरण्यासाठी आलेल्या शेरे-शेणोली स्टेशन (ता. कऱ्हाड) येथील पाचपैकी तिघांना पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र त्यातील दोघे सात हजाराचे चंदन घेऊन अंधारात पसार झाले.
विशाल मनोहर मदने (वय २०), रोहन रघुनाथ मंडले (१८) व किरण मनोहर मदने (१८) यांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मयूर भिवाजी जाधव व दत्ता धनाजी मदने (दोघेही रा. शेरे शेणोली स्टेशन) अशी फरारींची नावे आहेत.
पंचलिंगनगर (भाळवणी) येथील शेतकरी रवींद्र रामचंद्र नलवडे यांच्या शेतातील बांधावर चंदनाची झाडे होती. दि. १ सप्टेंबररोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पाच चंदन चोरटे दुचाकीवरून (क्र. एमएच ०९ बीएल ८११२) व (क्र. एमएच ५० पी-७१२४) कुऱ्हाड व करवत घेऊन नलवडे यांच्या शेतात आले होते. नलवडे यांनी गावातील अन्य तरुणांच्या मदतीने या चोरट्यांना पकडले. दोघे संशयित सात हजाराचे चंदन घेऊन फरार झाले. तीन संशयितांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.