लोकमत न्यूज नेटवर्क
वाटेगाव : बांबवडे (ता. शिराळा) येथील पिण्याच्या पाण्याचा आड गेल्या सत्तर वर्षांपासून लोकांच्या सेवेत आहे. गावातील लोक आजही या आडाचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात राजारामबापू पाटील यांनी ‘गाव तिथे आड’ हे धोरण राबवत दक्षिण सातारा जिल्हा लोकल बोर्डाच्या माध्यमातून आडाचे दगडी बांधकाम केले आहे. आजही हा आड येथील ग्रामस्थांच्या जगण्याची जीवनवाहिनी बनून राहिला आहे. गावात सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनेची व्यवस्था असतानाही लोक या आडाचा वापर करत आहेत. तर नळाद्वारे येणारे पाणी घरखर्चाला वापरत आहेत. तसा ग्रामसभेत ठराव केला आहे. ग्रामपंचायतदेखील वारंवार आडाची स्वच्छता व पाणी तपासणी करून घेते.
या आडाची निर्मिती १९५५ मध्ये पंचवार्षिक योजना काळात जिल्हा लोकल बोर्डाच्या माध्यमातून झाल्याची नोंद आडाच्या बांधकामावर आहे. याच गावातील बापू पवार यांनी आडाचे बांधकाम केले आहे. आज ते हयात नाहीत. आजचा सांगली जिल्हा पूर्वीचा दक्षिण सातारा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. त्या वेळच्या काळातील आडाच्या पाऊलखुणा आजही गावोगावी दिसून येतात. या पाऊलखुणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी विश्वास साखर कारखान्याचे संचालक विश्वास पाटील त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना सरपंच कोमल पाटील, ग्रामविकास अधिकारी महेश भोई व सर्व सदस्यांचे सहकार्य लाभत आहे.
कोट
आडाच्या बांधकामावर ग्रामपंचायतमधील सर्व पदाधिकारी व सदस्य, ग्रामस्थांचे विशेष लक्ष असते. वेळोवेळी दुरुस्ती केली जाते. येत्या काळात येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी एटीएम बसवण्याचा संकल्प आहे. त्यामुळे लोकांना स्वच्छ व सहज पाणी घेऊन जाता येईल.
- कोमल पाटील, सरपंच, ग्रामपंचायत बांबवडे
फोटो : ०८०२२०२१-आयएसएलएम-वाटेगाव न्यूज
बांबवडे (ता. शिराळा) येथे जुन्या काळातील आड व रहाटावर पाणी शेंदतााना ग्रामस्थ.