अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राष्ट्रवादीमधून राजकीय वजन असलेले तीन पाटील विकास आघाडीत येणार हे विक्रमभाऊ पाटील यांचे विधान फेक आहे. गेल्या चार वर्षांत त्यांनी केलेल्या विकासाबद्दल जनतेचा भ्रमनिरास झाला आहे, असा प्रतिटोला इस्लामपूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शहाजी पाटील यांनी लगावला. विक्रम पाटील यांनी पालिकेतील संभाव्य राजकारणाबाबत केलेल्या टीप्पणीबाबत ते ‘लोकमत’शी बाेलत हाेते.
पाटील म्हणाले, विकास आघाडीची अवस्था बुडत्याला काडीचा आधार असल्यासारखी आहे. त्यामुळेच विक्रमभाऊ राष्ट्रवादीबद्दल असे विधान करत आहेत. याउलट त्यांच्याच विकास आघाडीतील काही मातब्बर विद्यमान नगरसेवक अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक आहेत; परंतु आमचे नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, आपणास रेडिमेड कार्यकर्ता नको. नवीन युवा कार्यकर्त्याला तयार करा आणि त्यांना संधी द्या.
आगामी निवडणुकीपर्यंत विक्रमभाऊ पाटील यांनी स्वत:ची विकास आघाडी शिल्लक राहील का, याची अगोदर आत्मचिंतन करावे. इस्लामपूरचा खरोखरंच विकास करायचा असता तर जयंत पाटील यांंनी दिलेला निधी का मान्य नाही, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे. विकास आघाडीला मान्य नसेल तर राष्ट्रवादी स्वबळावर शहराचा विकास करण्यासाठी बांधील आहे. जयंत पाटील यांनी आणलेल्या निधीतून ५ कोटींची कामे सुरू करण्यात आली आहेत.
चौकट
शिवसेनाही नाराज
गेल्या चार वर्षांत विकास आघाडीतील नेत्यांची भूमिका पाहता स्वतंत्र गट असलेल्या शिवसेनेलाही पदोपदी अपमानास्पद वागणूक मिळाली असल्याने त्यांचेही नेते विकास आघाडीच्या भूमिकेबद्दल नाराज असल्याचे शहाजी पाटील यांनी स्पष्ट केले.
चौकट
बूथ कमिट्यांच्या अध्यक्षांची नगरपरिषदेसाठी तयारी
शहरात राष्ट्र्रवादीमध्ये जवळजवळ ५७ बूथ कमिटीचे अध्यक्ष कार्यरत आहेत. त्यातील बहुतांशी अध्यक्ष तरुण व सुशिक्षित आहेत. ते आपआपल्या प्रभागांत सक्रिय असून आगामी पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी आतापासूनच त्यांनी तयारी केली आहे. उमेदवार निवडीसाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे.