सांगली : ढोल-ताशांचा गजर, प्रत्येकाला ताल धरायला लावणारा लेझिमचा निनाद, फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आज शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सांगलीच्या विजयंता गणेश मंडळाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते. प्रतिवर्षी विजयंता मंडळाच्या मिरवणूक व त्यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांची सांगलीकरांना उत्सुकता असते. यंदा मंडळातर्फे येथील तरुण भारत क्रीडांगणावर प्रियांका शेट्टी यांच्या ‘नवरंगी नार’ या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास सांगलीकरांनी गर्दी केली होती. ठसकेबाज लावणीवरील नृत्यांगणांच्या अदाकारीवर रसिकांनी शिट्ट्यांची बरसात केली. लावणीचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास मिरवणुकीस प्रारंभ झाला. ‘श्रीं’ची आरती करण्यात आली. कार्यकर्त्यांनी यावेळी फटाक्यांची आतषबाजी केली. याप्रसंगी आ. संभाजी पवार, प्रियांका शेट्टी, सर्वाेदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, नगरसेवक गौतम पवार, बाळासाहेब गोंधळे, गोपाळ पवार आदी उपस्थित होते. मिरवणुकीत असलेले राजस्थानी ढोल पथक, सिंधुदुर्ग येथील सिद्धेय मालणकर यांचा कोंबडा डान्स यांनी या मिरवणुकीत रंगत आणली. गणेशभक्तांची गर्दी या कलाकारांभोवती झाली होती. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि उपेंद्र लिमये यांनीही कार्यक्रमांना हजेरी लावली होती. मारुती चौकातून सुरू झालेली मिरवणूक वाजत-गाजत हरभट रोड, बालाजी मंदिर चौक, कापडपेठ मार्गे कृष्णा नदीघाटावर आली. तेथे ‘मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)
‘विजयंता’चा जल्लोष...
By admin | Updated: September 7, 2014 00:24 IST