शिराळा : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरण प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे अखेर बुधवारी वारणा धरणातून व कालव्यातून सुटणारे पाणी धरणाच्या अधिकाऱ्यांना बंद करावे लागले. जोपर्यंत धरण व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत राज्यातील धरण व प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय श्रमिक मुक्ती दलाने घेतला. बुधवारी दुपारी बारा वाजता मणदूर येथील हुतात्मा स्मारकापासून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो धरण व प्रकल्पग्रस्त वारणा धरणाकडे मोर्चाने शासनाविरोधात घोषणा देत निघाले. मोर्चाचे नेतृत्व श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व सदस्य मारूती पाटील, वसंत पाटील, संतोष गोल्ल, डी. के. बोडके, दाजी शेलार, पांडुरंग कोठारी, आनंदा वकटे आदिंनी केले. धरणाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चा अडविला. त्यावेळी धरणग्रस्तांनी शासनाविरोधात घोषणा दिल्या. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी मारूती पाटील, वसंत पाटील यांची भाषणे झाली. वारणा धरणाचे कार्यकारी अभियंता यांनी आंदोलनस्थळी भेट ठेवून डॉ. भारत पाटणकर, तसेच धरण व प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. तसेच धरण व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याबाबत बैठकीच्या नियोजनाची तयारी सुरू असल्याचे सांगितले. यावेळी चांदोलीचे वन शाखा अभियंता प्रदीप कदम उपस्थित होते. कोकरूड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संग्राम शेडबाळे यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याची विनंती केली. दरम्यान, कोयना अभयारण्यातील पुनर्वसन झालेल्यांच्या शिशिंगे, झाडोली, डिचोली या मूळ गावी जाऊन घरांचे मूल्यांकन करण्याचे आदेश वन संरक्षक, कोल्हापूर २७ एप्रिल रोजी देणार असल्याची माहिती डॉ. भारत पाटणकर यांनी दिली. (वार्ताहर)
वारणा धरणाचे पाणी रोखले
By admin | Updated: April 23, 2015 00:04 IST