सलगरे/लिंगनूर : आपले तन आणि मन नेहमी प्रसन्न ठेवा. बालपण खेळ, मोबाईल, टीव्ही यांच्या अतिवापरात हरवू देऊ नका. मी आणि माझा गण्या तुमच्यासारख्या ग्रामीण भागातूनच पुढे आलो आहोत. बालपण एकदाच येते, ते एंजॉय करा, असा संवाद हास्यसम्राट अजितकुमार कोष्टी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांशी आज बालदिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा चाबूकस्वारवाडी येथील विद्यार्थ्यांनी साधला.बालदिनी मिरज तालुक्यातील चाबूकस्वारवाडी येथील जिल्हा परिषद शाळा येथे पाठ्यक्रमाच्या बाहेर जाऊन येथील शिक्षकांनी बालसवंगड्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांशी आॅनलाईन मोठ्या स्पिकरशी जोडणी करून मोबाईलवरून कॉन्फरन्सद्वारे अनोखा संवाद साधून दिला. या आॅनलाईन संवादात साहित्यिक व विचारवंत डॉ. बाबूराव गुरव, ग्रामीण कथाकथनकार बाबासाहेब परीट, राष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू आदित्यराज घोरपडे, राज्य कबड्डीपटू व क्रीडातज्ज्ञ सतीश आपटे, भाषा विषयतज्ज्ञ निवृत्त प्रा. अनघा कोटीभास्कर यांच्याशीही मोबाईल कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी काहींनी आपल्या बालपणातील गमती-जमती, विनोदाचे किस्से, गंभीर प्रसंग समजावून सांगितले. यावेळी डॉ. गुरव म्हणाले, आपल्या व्यक्तिमत्त्वाची बीजे लहानपणी रोवली जातात. भरपूर खेळा, व्यायाम करा, गाणी म्हणा अशा शब्दात हितगुज केली व आपल्या बालपणातील काही किस्से सांगितले. आदित्यराज घोरपडे म्हणाले, लहानपणी आपल्याला मिळालेल्या टाळ्या प्रेरणादायी असतात. आवडीच्या खेळात रस घ्या. बाबासाहेब परीट यांनी शिकार या त्यांच्या कथेचे उगमस्थान लहानपणीच होते, हे एका प्रसंगातून सांगितले. तसेच मन आणि शाळा स्वच्छ ठेवा, फटाक्यांऐवजी पुस्तके हातात घ्या, असे ते म्हणाले. स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही, तुमची शाळा, तुमचे पालक यांनी सहभाग घेतला पाहिजे, असेही सांगितले.या उपक्रमात सूर्यकांत नलवडे, शंकर कुंभार, मारुती हुलवान, प्रवीण जगताप, अशोक वाघावकर व मुख्याध्यापक सुखदेव वायदंडे यांनी सहभाग घेतला व त्यांनीही बालपणीचे संस्कारक्षम प्रसंग सांगितले. (वार्ताहर)
चाबूकस्वारवाडी शाळेत विविध उपक्रम
By admin | Updated: November 16, 2014 23:54 IST