लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : आटपाडी शहरात प्रस्तावित सिमेंट काँक्रिट रस्त्याऐवजी ठेकेदार कंपनीने डांबरीकरणाचा घाट घातल्याचा आरोप करत शुक्रवारी युवा नेते अनिल पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी काम बंद पाडले. संतप्त जमावाने यावेळी ठेकेदार राजपथ कंपनीच्या वाहनांची तोडफोड केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. प्रस्तावित सिमेंट काँक्रिटचा रस्ता होत नाही, तोपर्यंत कोणतेही काम होऊ देणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला.
आटपाडी शहरातून जाणारा दिघंची ते आरवडे या महामार्गाच्या कामामध्ये आटपाडी शहरातील अण्णा भाऊ साठे चौक ते धांडोर मळ्यादरम्यान चारपदरी सिमेंट काँक्रिटचा रस्ता प्रस्तावित होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व महामार्ग बनवणाऱ्या राजपथ कंपनीने तो डांबरीकरण करण्याचा घाट घालून आटपाडीकरांवर अन्याय केल्याचा आरोप अनिल पाटील यांनी केला आहे. यासाठी मागील काही महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आराखड्यानुसार रस्ता होत नाही, तोपर्यंत कोणतेही काम होऊ देणार नाही, असा इशारा देणारे निवेदन बांधकाम विभाग व राजपथ कंपनीला दिले होते.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी राजपथ कंपनीच्या वाहनाचा ताफा आटपाडी शहरात दाखल झाला. यावेळी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्याचा घाट सुरू होता. ही माहिती मिळाल्यावर अनिल पाटील व सहकाऱ्यांनी वाहनांच्या ताफ्याकडे येत काम सुरू न करण्याची मागणी केली. यावेळी संतप्त जमावाने जेसीबीसह अन्य वाहनांच्या काचा व इतर साहित्याची तोडफोड करत काम बंद पाडले. जोपर्यंत आटपाडीचा प्रस्तावित चारशे मीटर सिमेंट काँक्रिट रस्ता होणार नाही, तोपर्यंत कोणतेही काम करू देणार नाही.या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.
170921\1541-img-20210917-wa0000.jpg
राजपथ कंपनीचे वाहन