सांगली : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने वेग घेतला आहे. २१८ शासकीय केंद्रांवर मोफत लस दिली जात असून, खासगी रुग्णालयांच्या संख्येतही वाढ केली आहे. एक लाख ९७ हजार १८४ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शासनाकडून ८० हजार व्यक्तींना पुरेल एवढी लसही आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. शनिवारी एका दिवसात सर्वाधिक १४ हजार ८५५ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे.
लसीकरणाची केंद्रे वाढविल्यामुळे लसीकरणाचा आकडाही सध्या वाढत आहे. मागील पंधरा दिवसांत लस घेऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्ह्यातील ११५ आरोग्य उपकेंद्रांमध्येही लसीकरणाची व्यवस्था केली आहे. यामुळे जिल्ह्यात २१८ लसीकरणाची केंद्रे सुरू आहेत. एक लाख ९७ हजार १८४ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिली लस एक लाख ७८ हजार २६५ नागरिकांना, तर १८ हजार ९१९ नागरिकांना दोन्ही लसी दिल्या आहेत. सध्या जिल्ह्यात ८० हजार लसीची मागणीनुसार पुरवठा झाल्याचेही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले. लस मिळण्यात कोणतीही अडचण नाही. तसेच ४५ वयोगटातील लसीकरण सुरू केल्यामुळे लसीकरणाचे आकडे वेगाने वाढत आहेत.
चौकट
जिल्ह्यातील असे झाले लसीकरण
-आरोग्यसेवक : ३७३२६
-फ्रंटलाईन वर्कर्स : २३७३७
-ज्येष्ठ नागरिक : ९९३०२
-आजारी नागरिक : ३६८१९
-एकूण : १९७१८४
-शनिवारी एका दिवसात : १४८५५
-लसीचे दोन डोस घेतलेल्यांची संख्या : १८९१९