सांगली : शहरातील खणभागातील डायग्नोस्टिक सेंटरमध्ये मंगळवारपासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. खणभाग आणि नळभागातील नागरिकांसाठी या भागात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी नागरिक जागृती मंचच्या वतीने करण्यात आली होती.
महापालिकेच्या वतीने कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. खण भागात पंचमुखी मारुती रोडवर महापालिकेचे डायग्नोस्टिक सेंटर आहे. प्रभाग १६ मध्ये असलेल्या खणभाग आणि नळभागात दाट लोकवस्ती आहे. या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र नसल्याने नागरिकांना हनुमाननगर किंवा गावभागातील जैन बस्ती अशा लांबच्या केंद्रावर जावे लागत होते. यामुळे नागरिक जागृती मंच व स्थानिक नगरसेवकांनी खणभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्त नितीन कापडणीस यांनी हे केंद्र मंजूर केले.
मंगळवारी उपायुक्त राहुल रोकडे, नगरसेविका स्वाती शिंदे आणि सुनंदा राऊत, तौफिक शिकलगार, सुजित राऊत, डॉ. ऐनापुरे, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांच्या उपस्थितीत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे खणभाग आणि नळभागातील नागरिकांची लसीकरणाची सोय झाली आहे.