फोटो ओळ : कुपवाड येथील महापालिका आरोग्य केंद्रात नागरिकांना कोरोनाची लस देताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : कुपवाड शहरातील प्रभाग समिती तीनच्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महापालिका प्रशासनाने तीन ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. या तीनही केंद्रातून १२११५ नागरिकांना लसीकरण केले आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
ते म्हणाले की, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार कुपवाड शहर प्रभाग समिती तीनच्या कार्यक्षेत्रातील तीन आरोग्य केंद्रांत ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात आली आहे. कुपवाड आरोग्य केंद्रात डॉ. मयूर औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३२६८, अभयनगर आरोग्य केंद्रात डॉ. संजीवनी घाडगे यांच्या पथकाने ४७७७ तर द्वारकानगर आरोग्य केंद्रात डॉ. अंजली धुमाळ, डॉ. रोहिणी कुलकर्णी यांच्या टिमने ४०७० अशा तीन केंद्रांतून एकूण १२११५ नागरिकांना लसीकरणाचे डोस देण्यात आले आहेत.
गायकवाड म्हणाले की, ही लस नागरिकांना उपयुक्त आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका नाही. नागरिकांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा. गर्दीच्या ठिकाणी थांबू नका. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.