विद्यानगर येथे भुयारी गटारीबाबत माजी उपनगराध्यक्ष सिंधूताई गावडे, भाजप नेते हायुम सावनूरकर, विरोधी पक्षनेते विशाल वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली.
बैठकीत राहुल गावडे म्हणाले की, भुयारी गटारीचे काम मंजूर करत असताना विद्यानगर परिसरातील लोकसंख्या फक्त दोन हजार एवढीच विचारात घेतली आहे. परंतु या परिसरात ५ हजारावर लोकसंख्या आहे. पुढील २५ वर्षात ती दुप्पट होईल. परंतु कामाच्या आराखड्यात भविष्यातील वाढीव लोकसंख्या फक्त नऊशे गृहीत धरली आहे. हे कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आले, याचा खुलासा जनतेसमोर होणे गरजेचे आहे. गटारीसाठी तीन फूट व्यासाची पाईप वापरल्याशिवाय काम सुरू होऊ देणार नाही.
सावनूरकर म्हणाले की, काही नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक मलिदा खाण्याचा चंग बांधला आहे. तो आता जनतेसमोर उघडा पडला आहे. खासदार संजयकाका पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांच्यासमोर बैठक होईल. त्यानंतरच निर्णय होईल.
विशाल वाघमारे म्हणाले की, विद्यानगर आणि परिसरातील सांडपाणी निचरा होण्यास सोय नव्हती. त्यासाठी १ कोटी १४ लाख रुपये मंजूर होऊन काम सुरू आहे. सांडपाणी जाण्यास एक फुटाची पाईप टाकण्यात आली. ती तीन फुटांची पाईपलाइन टाकावी. नागरिकांच्या म्हणण्यानुसार काम न झाल्यास नगरपंचायतीवर तीव्र आंदोलन करू.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख नितीन बानगुडे-पाटील नगरविकास मंत्र्यांना भेटून चर्चा करणार असून शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष मारुती पवार यांनी दिला. मनसेचे वैभव पवार, आरपीआयचे अध्यक्ष पिंटू माने, धनंजय शिंदे, परसू कारंडे, सुधाकर भोसले, संजय सगरे, पांडुरंग तेली, सुरेश सुतार, समाधान कदम, अन्सार मुलाणी उपस्थित होते.