मिरज : शासनाचा महसूल बुडविण्यासाठी मालकांकडून वाळू तस्करीसाठी ट्रकवर बोगस नंबरचा वापर केला जात असल्याचे महसूल विभागाने केलेल्या कारवाईत उघडकीस आले आहे. या बोगसगिरीची महसूल विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. बोगस नंबरचा वापर करणाऱ्या ट्रक मालकांवर कारवाई करण्याचे आदेश उपप्रादेशिक परिवहन विभागाला देण्यात येणार असल्याची माहिती मिरजेचे नायब तहसीलदार शेखर परब यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातून मिरज, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याकडे मोठ्या प्रमाणात चोरटी वाळू तस्करी सुरू आहे. या चोरट्या वाळू वाहतुकीवर महसूल विभागाने करडी नजर ठेवली आहे. या विभागाच्या भरारी पथकाकडून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे ट्रक पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली जात आहे. मात्र या कारवाईत ट्रक मालकांनी केलेल्या बोगसगिरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाळूला सोन्याचा दर आल्याने अनेकांनी वाळू तस्करीसाठी मालकीच्या ट्रकच्या संख्येत वाढ केली आहे. एका मालकाचे किमान चार ते पाच ट्रक आहेत. ट्रक मालकांनी एकाच ट्रकचा महसूल भरुन चार ट्रकचा महसूल बुडविण्यासाठी बोगस नंबरचा वापर करुन वाळू तस्करी सुरू केली आहे. वाळू तस्करीप्रकरणी तहसीलदार शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने केलेल्या कारवाईत हा खरा प्रकार उघडकीस आला आहे. (वार्ताहर)बोगसगिरी करणाऱ्या मालकांवर कारवाई होणार का?वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर बोगस नंबरचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे करण्यात आल्या होत्या, मात्र याची या विभागाने फारशी दखल घेतली नसल्याच्या तक्रारी आहेत. तहसीलदारांकडून ट्रकवर बोगस नंबरचा वापर करणाऱ्या मालकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभाग ट्रक मालकांवर कारवाई करणार, की त्यांना अभय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.चार ट्रक मालकांना ५ लाख ३४ हजार दंडतहसीलदार शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या भरारी पथकाने खंडेराजुरी-सिध्देवाडी या मार्गावर वाळू तस्करी करणारे चार ट्रक पकडले होते. बेकायदेशीर वाळू वाहतूकप्रकरणी परशुराम कृष्णा मंडले, मोहन विलास खरात, नितीन दिगंबर शिंदे, मुकुंद रामचंद्र जाधव या ट्रक मालकांकडून ५ लाख ३४ हजार रुपयांचा दंड आकारुन त्यांची वाहने सोडण्यात आली.
वाळू तस्करीसाठी ट्रकवर बोगस नंबरचा वापर
By admin | Updated: October 27, 2016 23:26 IST