शिराळा : कोकरुड, शेडगेवाडी, चिखली (ता. शिराळा) येथील बारावीच्या परीक्षा केंद्रांवर आज (मंगळवार) हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेऐवजी उर्दू प्रश्नपत्रिकांचे वाटप झाल्याने, केंद्र संचालक, शिक्षक, परीक्षार्थी यांचा गोंधळ उडाला. यामुळे सुमारे २0 मिनिटे परीक्षेला उशीर झाला. हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढून त्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आल्यानंतर परीक्षा सुरळीत पार पडल्या.शेडगेवाडी येथील परीक्षा केंद्रावर १६९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ४९ विद्यार्थ्यांना, कोकरुड येथील १८२ विद्यार्थ्यांपैकी सुमारे ९0 विद्यार्थ्यांना, तर चिखली केंद्रावरील सर्वच २१४ विद्यार्थ्यांना उर्दूच्या प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांत गोंधळ उडाला. केंद्र प्रमुखांनी त्वरित शिक्षण विभाग व विभागीय कार्यालयाशी संपर्क साधला. यावेळी त्यांना, उर्दू पेपर तसेच ठेवून हिंदी विषयाच्या पेपरच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना द्या, असे सांगण्यात आले. त्यानुसार केंद्र प्रमुखांनी हिंदी प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढून त्यांचे विद्यार्थ्यांना वाटप केले. त्यामुळे परीक्षेला १५ ते २0 मिनिटे उशीर झाला. या विषयाची तेवढी वेळ वाढवून परीक्षा सुरळीत पार पडली.मात्र या घटनेमुळे केंद्र संचालक, शिक्षक, तसेच विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. या घटनेनंतर या केंद्रामार्फत शिक्षणाधिकारी बाजीराव देशमुख यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. या परीक्षा केंद्रास उपशिक्षणाधिकारी, विभागीय संचालकांनी भेट देऊन, परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत सुरू असल्याची पाहणी केली.उर्दूचा पेपर शनिवारीच झाला आहे. मात्र आज तीन या केंद्रांवर ३५३ उर्दू पेपर हिंदी पेपरबरोबर आले कसे? विद्यार्थ्यांवर वाढलेला ताण, त्याचा परीक्षेवर झालेला परिणाम, याला जबाबदार कोण? असा सवाल पालकांतून होत आहे. (वार्ताहर)तासगावमध्येही उर्दू पेपरतासगाव येथेही वसंतदादा पाटील महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर हिंदीऐवजी उर्दू विषयाच्या प्रश्नपत्रिका आल्या होत्या. मात्र परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धा तास हा प्रकार परीक्षा केंद्रप्रमुखांच्या लक्षात आला. या केंद्रावर हिंदीचे १५१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. परीक्षेच्या वेळेपूर्वी प्रश्नपत्रिकांच्या वेष्टनावर असलेल्या विशिष्ट पारदर्शी भागातून हे पेपर हिंदीचे नसून उर्दूचे असल्याचे केंद्रप्रमुखांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने विभागीय अधिकाऱ्यांना माहिती देऊन दुसऱ्या केंद्रावरील जादाच्या प्रश्नपत्रिका मागवून घेतल्या. या प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली.
बारावीला हिंदीऐवजी उर्दू प्रश्नपत्रिका
By admin | Updated: February 25, 2015 00:04 IST