सांगली : सांगली-मिरजेतील नाट्यगृहांना प्रिमायसेसचा परवाना नसतानाही दीनानाथ, विष्णुदास भावे व बालगंधर्व नाट्यगृहात बिनधास्त कार्यक्रमांचे प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आज (शुक्रवारी) कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या नाट्यगृहांचे चार ते पाच वर्षापासून परवान्याचे नूतनीकरण न करता नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे आज स्पष्ट झाले.नाट्यगृहांना प्रत्येकवर्षी प्रिमायसेस परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. या परवान्यासाठी अर्ज करताना त्यांना आरोग्य विभाग, फायर आॅडीट, सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाहरकत परवाना जोडावा लागतो. या कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वर्षासाठी नाट्यगृहांना प्रिमायसेसचा परवाना देण्यात येतो. त्यानंतर प्रत्येक प्रयोगाला पोलिसांचा परवाना घेऊन त्यांना कार्यक्रम घेण्यास मान्यता मिळते. असे असताना सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यमंदिर, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह व मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिराकडे प्रिमायसेसचा परवाना नाही.विशेष म्हणजे भावे नाट्यमंदिरने डिसेंबर २००८ पासून म्हणजे गेल्या सात वर्षात परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाकडे तीन वर्षापासून म्हणजे डिसेंबर २०१२ पासून परवान्याचे नूतनीकरण नाही, तर ‘बालगंधर्व’ कडेही वर्षापासून नूतनीकरण नाही. परवान्याचे नूतनीकरण नसतानाही या तिन्ही नाट्यगृहांत आठवड्यातून किमान तीन-चार प्रयोग होत आहेत. यामध्ये लावणी, नाटक, आॅर्केस्ट्रा यासह शालेय मुलांच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमांचाही समावेश आहे.आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन दल आदी विभागांचे नाहरकत परवाने घेऊन, केवळ चारशे रुपयांच्या शुल्कावर हे परवाने मिळत असतानाही याकडे नाट्यगृहांनी दुर्लक्ष करून बिनाधास्त प्रयोग सुरू ठेवले आहेत. प्रयोग सुरू असताना कारवाईच्या बडग्यातूनही स्वत:ची सुटका करवून घेतली आहे. (प्रतिनिधी)आठवडाभरात परवाना घेऊबालगंधर्व नाट्यगृहाचे लिपिक गेल्या महिन्याभरापासून रजेवर असल्यामुळे परवान्याचे नूतनीकरण झालेले नाही. येत्या आठवडाभरात परवान्याचे नूतनीकरण करून घेण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त सुनील नाईक यांनी दिली. काही कारणांमुळे नूतनीकरण झालेले नाही, मात्र लवकरात लवकर परवाने घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.गेल्या आठ दिवसात नाट्यगृहात झालेले प्रयोगबालगंधर्व मिरज - मराठी पाऊल पडते पुढे, जादूगार विश्वसम्राटभावे नाट्यमंदिर - ढॅण्टॅढॅण, लग्नबंबाळदीनानाथ मंगेशकर नाट्यगृह - रंग खेळू चला, जलवा (लावणी महोत्सव), बेस्ट फाईव्ह (लावणी)ज्या नाट्यगृहांनी अद्याप परवान्याचे नूतनीकरण करून घेतले नाही, मात्र व्यावसायिक प्रयोग चालू केले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तिकीट लावून प्रयोग आता त्यांना करता येणार नाही. याचे उल्लंघन केल्यास नियमानुसार नाट्यगृह चालकावर कारवाई करण्यासाठी पावले उचलली जातील.- संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी, सांगली.रसिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविणे हे नाट्यगृह चालकाचे कर्तव्य नव्हे, कामच आहे. त्यासाठीच ते पैसे घेतात. रसिकांनाच नव्हे, तर त्याठिकाणी कला सादर करण्यासाठी आलेल्या कलाकारांनाही सुविधा दिल्या पाहिजेत. शॉर्टसर्किटने आग लागून नुकसान झाले होते. अशा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य सुविधा देऊन रितसर परवानगी घेतली पाहिजे.- शफी नायकवडी, रंगकर्मी, सांगलीभावे नाट्यमंदिराचे नूतनीकरणविष्णुदास भावे नाट्यमंदिराचे ४ फेब्रुवारीपासून नूतनीकरण सुरू आहे. यासाठी आगामी दोन महिने नाट्यगृह बंद असणार आहे, अशी माहिती व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी दिली. विविध विभागांच्या सूचनेनुसार नाट्यगृहात बदल करण्यात येत आहेत. त्यानंतर त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊन नाट्यगृहाच्या परवान्याचे नूतनीकरण करुन घेण्यात येईल.+
नाट्यगृहांत विनापरवाना ‘प्रयोग’ सुरूच
By admin | Updated: February 7, 2015 00:16 IST