उपचार सुविधा नसतानाही रुग्ण दाखल करुन घेणाऱ्या डॉ. महेश जाधव याच्यासोबत त्याच्या कोविड रुग्णालयास नियमबाह्य परवानगी देणारी महापालिकाही यास तितकीच जबाबदार असल्याची सामान्यांची प्रतिक्रिया आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल-मे दरम्यान कोविड रुग्णांची संख्या दररोज दोन हजारापर्यंत पोहोचल्यानंतर एप्रिल महिन्यात डॉ. महेश जाधव याने मिरजेत अॅपेक्स रुग्णालयात काेविड उपचार सुरू करण्यासाठी एका पत्राद्वारे महापालिकेकडे मागणी केली. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर, व्हेंटिलेटर व वैद्यकीय सुविधा आहेत का? याची तपासणी न करता महापालिका प्रशासनाने त्यास लगेच परवानगी दिली. ही नियमबाह्य परवानगी आता संशयाच्या भोवऱ्यात आहे. डॉ. जाधव याच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर असल्याचे कागदोपत्री दर्शविण्यात आले. येथे दोन महिन्यात २०५ पैकी ८७ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही प्रशासनाकडून डेथ ऑडिट झाले नाही. उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील साहित्याची मोडतोड केल्यानंतर या रुग्णालयाबाबत तक्रारींची दखल घेण्यात आली.
महापालिकेच्या आरोग्य पथकाच्या तपासणीत या रुग्णालयात सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याचे आढळले. उपचारास प्रतिबंध केल्यानंतरही डॉ. जाधव याने नवीन रुग्ण दाखल करून घेतल्याने महापालिका आरोग्याधिकाऱ्यांनी महिन्यापूर्वी गांधी चौक पोलिसात डॉ. जाधव याच्याविरुद्ध तक्रार दिली. डॉ. जाधव याने अंतरिम अटकपूर्व जामीनही मिळविला. मात्र पोलिसांनी रुग्णालयातील ८ कर्मचाऱ्यांना अटक केल्यानंतर जाधवचे कारनामे उघड झाले. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्याच्याविरुद्ध पोलिसांनी पुरावे सादर केले. न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर पलायन करणाऱ्या डॉ. जाधवला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. पोलीस कोठडीत असलेल्या जाधव याच्या चौकशीत रुग्णांची लूटमार करण्यासाठी त्याला मदत करणाऱ्यांची नावे उघडकीस येत आहेत. त्यास मदत करणारे त्याचे बंधू सांगलीतील न्यूरोसर्जन डाॅ. मदन जाधव यांनाही याप्रकरणी अटक झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. डाॅ. जाधव याने कागदोपत्री नियुक्ती दाखवलेल्या काही डॉक्टरांनी या प्रकरणात हात वर केले आहेत.
दरम्यान, रुग्णालयात उपचार सुविधा नसतानाही कोविड रुग्णालयास परवानगी देणारे महापालिका अधिकारीही यास तितकेच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया आहे.
डॉ. महेश जाधव यांने अॅपेक्स रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर खोट्या उपचाराची कागदपत्रे तयार केल्याचे पोलिसांच्या चाैकशीत निष्पन्न झाले आहे. अॅपेक्स हॉस्पिटलप्रकरणी आतापर्यंत दहा जणांना पोलिसांनी अटक केली असून, रुग्णालयास नियमबाह्य परवाना देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांनाही चाैकशीला तोंड द्यावे लागणार आहे.
चाैकट
वैद्यकीय सुविधांची पडताळणी करूनच नियमानुसार अॅपेक्सला परवानगी दिल्याचा महापालिका आरोग्याधिकाऱ्यांचा दावा आहे. मात्र महापालिका आरोग्य विभागाने साध्या अर्जावर अॅपेक्स रुग्णालय सुरू करण्याची परवानगी दिल्याचे व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णालयाची तपासणी झाली नसल्याचे पोलिसांना कळविल्याने याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
चाैकट
रुग्णालयात गतवर्षी ५४ व यावर्षी तब्बल ८७ कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. डॉ. जाधव याच्याकडे आवश्यक वैद्यकीय सुविधा नसतानाही कोविड रुग्णालयास मिळालेली परवानगी रुग्णांच्या जिवावर बेतल्याचे स्पष्ट होत आहे. काही महापालिका अधिकाऱ्यांशी जाधव याची जवळीक असल्याचे निष्पन्न झाल्याने साध्या अर्जावर रुग्णालयास परवानगी देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर याप्रकरणी कारवाईची टांगती तलवार असल्याचीही चर्चा आहे.