सांगली : पक्षीय पदांच्या वाटपानंतरही भाजपमध्ये सध्या अस्वस्थतेचे वारे वाहू लागले आहे. निष्ठावंतांच्या गटाबरोबरच बाहेरील पक्षातून मोठ्या अपेक्षेने भाजपमध्ये आलेल्यांच्या पदरी अद्याप काहीच पडलेले नाही. त्यामुळे नाराजीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भाजपमध्ये मंत्रिपदाच्या आणि महामंडळाच्या शर्यतीत अनेकजण आहेत. इच्छुकांच्या यादीत जुन्या मंडळींचाच अधिक भरणा आहे. पक्षात सध्या पहिल्या फळीतील प्रतिष्ठित नेतेमंडळींचेच वर्चस्व आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील लोकांच्या पदरात काहीही पडलेले नाही. पक्षीय कार्यकारिणीत एखादे तरी पद मिळेल, अशा अपेक्षेने अनेकजण निवडीच्या कार्यक्रमाला गर्दी करून होते, मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला. कार्यकारिणीत दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीला डावलण्यात आले. बाहेरून म्हणजे राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसमधून आलेल्या लोकांना तर यात फारसे स्थान मिळाले नाही. अपवाद एक-दोन पदाधिकाऱ्यांचे होते. त्यामुळे बाहेरून आलेल्या आणि पक्षात रुळण्याची इच्छा असलेल्यांच्या पदरात नाराजी आली. सत्तेत असल्याने भाजपमध्ये सध्या नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांच्याच अपेक्षा जास्त उंचावल्याने अस्वस्थता वाढीस लागली आहे. भाजपच्या निवडी झाल्यानंतर अशा अनेक लोकांना नाराजी लपविता आली नाही. अनेकांनी निवडीच्या कार्यक्रमाला औपचारिक हजेरी लावून निवड झाल्यानंतर लगेचच घर गाठले. नाराजीबद्दल उघडपणे बोलल्यास पक्षशिस्त मोडल्याचा ठपका बसेल म्हणून अनेकांनी आपली नाराजी लपविण्याचा प्रयत्न केला. उत्साही कार्यकर्त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतरही बराच वेळ टिळक स्मारक मंदिरात हजेरी लावली होती. दुसरीकडे नाराजांनी हजेरी लावून औपचारिकता पूर्ण केली होती. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधील अनेक दिग्गज नेते पक्षात आले आहेत. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही आल्याने एवढा मोठा फौजफाटा आता कसा हाताळायचा, असा प्रश्न आता पदांच्या वाटपात अग्रेसर असलेल्या भाजपच्या जुन्या मंडळींना पडला आहे. याच प्रश्नांच्या संभ्रमावस्थेतून निवडीचा गोंधळ स्पष्टपणे दिसला. गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात कोणत्याही पदाचे वाटप झाले नव्हते. अचानकपणे झालेल्या निवडीच्या बैठकीत कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता दूर होईल, अशी आशा होती. प्रत्यक्षात आशेला निराशेचे ग्रहण लागले.सांगलीतील एका पदाधिकाऱ्याने निवडीनंतर संबंधित पदाचा नेमका उपयोग काय, असा प्रश्न पडल्याची खंत पत्रकारांसमोर व्यक्त केली होती. (प्रतिनिधी)आणखी एक गाजरअस्वस्थतेच्या वाऱ्याचे आता नेमके काय परिणाम होणार, याची चर्चा आता रंगली आहे. नाराज असलेल्या लोकांना महामंडळांचे गाजर दाखविले जाणार असल्याची चर्चा आहे. मंत्रिपदासाठी आमदारांना दाखविलेले गाजर आता दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांवर आजमावले जाण्याची चिन्हे आहेत.
पदाधिकारी निवडीनंतरही भाजपमध्ये अस्वस्थता
By admin | Updated: January 18, 2016 00:34 IST