मिरज : मिरजेत शहराच्या सुशोभिकरणासाठी लोकनिती सोशल फाऊंडेशनने गणेश तलावाजवळ उभारलेल्या ‘आय लव्ह मिरज’ या सेल्फी पाॅईंटची सोमवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. तलावाजवळ राहणाऱ्या एका तरुणाने सेल्फी पाॅईंटच्या दिव्यांची तोडफोड केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आल्याने याबाबत फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. सेल्फी पॉईंटच्या मोडतोडीच्या विध्वंसक कृत्याचा सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध केला.
मिरजेतील गणेश तलाव येथे दोन दिवसांपूर्वी सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले. येथे सेल्फी काढण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी गर्दी केली हाेती. मात्र, सोमवारी रात्री अज्ञातांनी या सेल्फी पाॅईंटची तोडफोड केली. ‘आय लव्ह मिरज’मध्ये असलेले बदाम फोडून व त्यातील लाईट्स उचकटून तलावात फेकून दिल्याचे दिसून आल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकनिती फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली असून, सेल्फी पाॅईंटची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली. गणेश तलाव परिसरातील सीसीटीव्हीमध्ये तलाव परिसरातीलच एका तरुणाने ही मोडतोड केल्याचे निष्पन्न झाले. सेल्फी पाॅईंटची पुन्हा दुरुस्ती करण्यात येणार असून या विध्वंसक वृत्ती रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
चाैकट
सामाजिक कार्यकर्त्यांकडून खर्च; नगरसेवकांचे माैन
मिरजेत सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने पहिला सेल्फी पाॅईंट तयार केला आहे. स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा करणाऱ्या महापालिकेने सांगलीत अनेक ठिकाणी अनेक चौक सुशोभिकरण करून सेल्फी पॉईंट तयार केले आहेत. मात्र, मिरजेत केवळ स्वच्छ भारत अभियानाच्या भिंती रंगविण्यात आल्या आहेत. मिरजेतील नगरसेवकही याबाबत माैन धरून आहेत. मिरजेत एकही चौक सुशोभिकरण किंवा सेल्फी पाॅईंट झाला नसल्याने नागरिकांनी स्वखर्चाने सेल्फी पाॅईंट उभारला आहे.