जत : मिरवाड (ता. जत) येथील साठवण तलावात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह रविवारी आढळून आला आहे. त्याचे वय अंदाजे ३५ ते ३८ असून याप्रकरणी मिरवाडचे पोलीस पाटील बजरंग पाटील यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.
डफळापूर ते मिरवाड रस्त्यावर मिरवाडपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या साठवण तलावात सात फूट पाणीसाठा आहे. तलावाच्या पश्चिम बाजूला तीन फूट पाणीसाठा असलेल्या ठिकाणी गारवेलमध्ये एका अनोळखी तरुणाचा मृतदेह अडकून तरंगत असल्याचे काही नागरिकांना आढळून आले. त्यांनी पोलीस पाटील बजरंग पाटील यांना माहिती दिली.
मृताच्या अंगात निळी जीन्स पॅन्ट व हाफ टी शर्ट आहे. टी-शर्टवर सुपर डीआरआय सरप्लस असे गोल आकारात इंग्रजीत लिहिले आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी हा मृतदेह तलावातील पाण्यात असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिरवाड गाव कर्नाटक सीमेलगत आहे. यामुळे हा मृत व्यक्ती कर्नाटक राज्यातील असावी असा संशयही गावातील नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जत पोलीस करत आहेत.