ढालगाव : मिरज-पंढरपूर राज्यमार्गावरील आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील फाट्यावर एका पुरुषाचा मृतदेह गुरुवारी आढळून आला. पोलिसांनी खुनाचा संशय व्यक्त केला आहे. सुमारे ५० वर्षे वयाचा पुरुष जातीचा अनोळखी मृतदेह आगळगावपासून दीड किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूस टाकल्याचे गुरुवारी दुपारी आढळून आले. मृतदेहाच्या उजव्या दंडावर ‘जनाबाई मार्तंड माळी’ असे, तर डाव्या हातावर हनुमानाचे चित्र गोंदलेले आहे. उजव्या हातावर चर्च व छातीवर ‘आई तुझा आशीर्वाद’ असे गोंदलेले आहे. मिरज-पंढरपूर मार्गापासून केवळ अर्धा किलोमीटरवर आगळगाव फाटा - आगळगाव या रस्त्यालगतच्या चरीत हा मृतदेह टाकला असून, याबाबत पोलीस निरीक्षक शिराज इनामदार म्हणाले की, दोरीने गळा आवळून खून केला असावा, असा अंदाज आहे. कवठेमहांकाळ येथे शवविच्छेदन केले असून, मृतदेहाच्या गळ्यावर दोरीचे व्रण आहेत. त्यामुळे घातपाताचा संशय बळावला आहे. डीएनए चाचणी होणार रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन अहवाल मिळाला नसला तरी कवठेमहांकाळ पोलिसांनी हा खुनाचाच प्रकार आहे, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मृतदेहाची डीएनए चाचणी केली जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
आगळगावजवळ अज्ञाताचा खून
By admin | Updated: September 11, 2015 00:54 IST