इस्लामपूर : भडकंबे, नागाव परिसरातील १४ एकर शेतजमीन बनावट वटमुखत्यारपत्र करुन हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यातील अन्य १२ संशयित फरारी असून अटक केलेल्या दोघांना येथील न्यायालयाने १६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. संशयितांमध्ये दोन वकिलांचाही समावेश आहे. याच घटनेत न्यायालयाची फसवणूक करण्याचा प्रकारदेखील घडला आहे.बाळासाहेब दादासाहेब पाटील (वय ३८, रा. भडकंबे, ता. वाळवा) व दीपक बाबासाहेब पाटील (४१, रा. नागाव, ता. वाळवा) अशी अटकेत असणाऱ्यांची नावे आहेत. इतर संशयितांमध्ये बाबासाहेब रामगोंडा पाटील (नागाव), दादासाहेब रामगोंडा पाटील (भडकंबे), कलावती भाऊसाहेब देसाई (कवठेपिरान, ता. मिरज), सुशिला महादेव पाटील, लक्ष्मीबाई शिवगोंडा पाटील, अरुण शिवगोंडा पाटील, रावसाहेब शिवगोंडा पाटील (नागाव), कस्तुरी गणपती देसाई (कवठेपिरान), अॅड. यशवंतराव मारुती अहिर (सांगली) व अॅड. अशोक शंकर वाळिंबे (इस्लामपूर) यांचा समावेश आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरील सर्वांनी संगनमताने कटकारस्थान करुन फिर्यादी काशीबाई शंकर पाटील (वय ६१, रा. टाकवडे, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांचे मृत वडील पिरगोंडा बाळा पाटील यांच्या नावाने बनावट वटमुखत्यार तयार करुन त्यावर शासनाचे बनावट शिक्के मारले. त्यानंतर इस्लामपूर येथील कनिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात हे बनावट वटमुखत्यारपत्र मृत पिरगोंडा पाटील अथवा त्यांच्यातर्फे वकील हजर नसताना दाखल करुन बनावट हुकूमनामा घेऊन कोर्टाची फसवणूक केली आहे. ही घटना १0 ते २८ जानेवारी २00५ दरम्यान घडली आहे. शेवटी काशीबाई पाटील यांनी इस्लामपूर पोलिसांत वरील सर्वांविरुध्द फिर्याद दिली. स. पो. नि. एस. के. हवलदार, सोमनाथ पाटील, हेमंत तांबेवाघ अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
बनावट वटमुखत्यारपत्राद्वारे जमीन हडपण्याचा प्रकार
By admin | Updated: August 13, 2014 23:35 IST