मिरज : मिरजेत लोणीबाजारात शनिवारी दुपारी मोठ्या वडाच्या झाडाची फांदी अचानक तुटून पडल्याने नागरिकांची धावपळ उडाली. झाडाखाली बसलेल्या दोन भाजीपाला विक्रेत्या महिला किरकोळ जखमी झाल्या. बाजाराच्या गर्दीत ही घटना घडल्याने काही काळ गाेंधळ उडाला. फांदी पडून विद्युत तारा तुटल्या. रस्त्यावर झाडाची फांदी पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. महापालिका अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ती फांदी हटविली.
महापालिका कार्यालयामागे लोणीबाजार रस्त्यावर मोठी झाडे आहेत. रस्त्याच्या एका बाजूला जुन्या मोठ्या वडाच्या झाडाखाली रोज विक्रेते भाजीविक्रीसाठी बसतात. शनिवारी दुपारी दीड वाजता वडाच्या झाडाची एक फांदी तुटली. विद्युत तारांमध्ये अडकून तारा तुटून फांदी खाली पडली. यात झाडाखाली थांबून भाजीपाला विक्री करणाऱ्या महिला किरकोळ जखमी झाल्या. यावेळी भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली होती.