फोटो-१२ सूरज मुल्ला
विटा : विटा शहरातून दुचाकी चोरी करून तिची विक्री करणाऱ्या चोरट्यास गुरुवारी विटा पोलिसांनी जेरबंद केले. सूरज नजीर मुल्ला (वय ३५. रा. कऱ्हाड रोड, विटा) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडील पाच चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
विटा येथील नेवरी रस्त्यावरील विक्रम राजाराम भिसे यांच्या घरासमोरून त्यांची दुचाकी ७ ऑगस्ट २०२१ रोजी चोरी झाली होती. या प्रकरणी भिसे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरून पोलीस तपास करत होते. तपासादरम्यान गुरुवारी संशयित सूरज मुल्ला चोरीतील दुचाकी विक्रीसाठी विटा येथील मुल्ला गल्लीत घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार सापळा लावण्यात आला.
सूरज मुल्ला या ठिकाणी आला असता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चाैकशी केली. यावेळी त्याने दुचाकीची चोरी करून त्याची विक्री करणार असल्याची कबुली दिली. पोलिसांनी अधिक चाैकशी केली असता त्याने आणखी चार दुचाकी चोरी केल्याचीही कबुली दिली. पोलिसांनी मुल्ला याला अटक केली आहे. चोरीतील सर्व पाचही दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र भिंगारदेवे, हणमंत लोहार, अमरसिंह सूर्यवंशी, शशिकांत माळी, सुरेश भोसले, मारुती गायकवाड, सुहास स्वामी, रोहित पाटील यांनी ही कारवाई केली.