सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी काहीशी घट झाली असली, तरी दोघांचा मृत्यू झाल्याने चिंता कायम आहे. दिवसभरात २४ जणांना कोरोनाचे निदान होतानाच मिरज शहर व खानापूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. १५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या आठवड्यापासून बाधितांच्या संख्येत वाढच होत आहे. गुरुवारी नवीन बाधितांची संख्या कमी झाली असली तरी पंधरवड्यात प्रथमच एका दिवसात दोन मृत्यूची नोंद झाली आहे. सांगली शहरात सर्वाधिक १४ रुग्ण, तर आटपाडी, तासगाव आणि जत तालुक्यांत प्रत्येकी तीन रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या आरटीपीसीआरअंतर्गत ४०६ जणांच्या तपासणीतून १६ जण पॉझिटिव्ह आढळले, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ३६७ जणांच्या तपासणीतून १० जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३०५ वर पोहोचली असून, त्यात ४५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३९ जण ऑक्सिजनवर, तर ६ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. कोल्हापूर व कर्नाटकातील प्रत्येकी एकास कोरोनाचे निदान झाले आहे.