सांगली : गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करून ‘डॉल्बी’चा दणदणाट सुरूच ठेवल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दोन मंडळांचा डॉल्बी जप्त केला आहे. याप्रकरणी या मंडळांच्या अध्यक्षांसह डॉल्बी मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत सात मंडळांचे डॉल्बी जप्त करून गुन्हे दाखलची कारवाई झाली आहे.बुरुड गल्लीतील बुरुड चौक गणेश मंडळ (अध्यक्ष- शशिकांत नागे) व खणभागातील न्यू विजय क्रीडा मंडळ (अध्यक्ष- तुषार चौगुले) व डॉल्बीमालक बाजीराव भोरे (अंकली), रविराज कांबळे (सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बाजीराव भोरे यांनी बुरुड गल्लीतील, तर रविराज कांबळे यांनी खणभागातील मंडळास डॉल्बी भाड्याने दिला होता. या मंडळांकडून काल (गुरुवार) काढलेल्या मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. डॉल्बीचे सर्व साहित्यही जप्त केले आहे. डॉल्बीने नागरिकांच्या आरोग्यास धोका होतो. यामुळे आवाजाची मर्यादा कोणीही ओलांडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी केले आहे. डॉल्बीच लावू नका, अशीही त्यांनी विनंती केली आहे. मात्र आतापर्यंत सात मंडळांनी डॉल्बी लावण्याचे धाडस केले. याशिवाय त्याचा आवाजही मर्यादेपेक्षा मोठा ठेवला. यामुळे पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागला. मंडळांनी लावलेल्या डॉल्बीच्या आवाजाची, ध्वनितीव्रता मापन यंत्राद्वारे ठिकठिकाणी तपासणी करण्यात आली. यामध्ये कर्कश्श आवाजाचे या दोन मंडळांचे डॉल्बी आढळले. (प्रतिनिधी)आता तपास होणार...मंडळांनी लावलेल्या डॉल्बीच्या आवाजाची तपासणी करण्यासाठी विशेष पथक तैनात केले आहे. हे पथक ध्वनिमापक यंत्राद्वारे तपासणी करते. त्यानंतर त्याची प्रिंट करून संबंधित मंडळांच्या कार्यकर्त्यांना आवाजाची मर्यादा ओलांडली असल्याचे दाखवून देते. पुढे याच प्रिंटच्या पुराव्याआधारे गुन्हा दाखल केला जातो. मात्र आता याचा पोलीस उपअधीक्षकांकडून तपास होणार आहे. तपासाचा अहवाल जिल्हा पोलीसप्रमुखांना सादर केला जाणार. त्यानंतर गुन्हे दाखल झालेल्या संशयितांवर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सांगलीत आणखी दोन डॉल्बी जप्त
By admin | Updated: September 5, 2014 23:31 IST