लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राष्ट्रीय महामार्गावरून नेर्ले ते पेठनाकादरम्यान वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चालक आणि क्लिनरला मारहाण करून ट्रकची चोरी करणाऱ्या टोळीतील आणखी दोघा जणांना इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. दोघांना न्यायालयाने १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आतापर्यंत या घटनेत एका अल्पवयीनासह सहाजणांना अटक केली आहे.
सूरज बासू मुलाणी (वय ३१, रा. कुपवाड, सांगली) व दाऊद बंदेखान सय्यद (१९, रा. कुपवाड, सांगली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी यापूर्वी अतुल शहाजी इथापे (रा. वाढेगाव, सांगोला), चंद्रकांत सुभाष जाधव (कुुपवाड) व प्रवीण मधुकर इथापे (रा. देवनाळ, जत) अशा तिघांना अटक केली आहे. यातील इतर दोन चोरटे अद्याप फरार आहेत.
या टोळीने वाळूने भरलेला चौदाचाकी ट्रक अडवून बसवराज आनंदराव पाटील आणि हणमंतराय संगाप्पा माडग्याळ (दोघे रा. जाडरबोबलाद) या दोघांना जबर मारहाण करत त्यांना तुंग फाट्यावर सोडून देत ट्रकची चोरी केली होती. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे अधिक तपास करीत आहेत.